सभेभोवती कडे करा  भाजपच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या सूचना 

residentional photo
residentional photo

नाशिक ः शेतकऱ्यांच्या संतापातून यापूर्वी झालेली कांदाफेक लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू असताना नगर शहरातील सभेत नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असतानाच नागरिक उठून गेल्याच्या घटनेचा भाजपने धसका घेतला आहे. त्यामुळे गर्दी होईल की नाही, याची एका बाजूने चिंता करताना दुसरीकडे गर्दी झाल्यास नागरिक उठून जावू नये म्हणून सभेभोवती भाजप कार्यकर्त्यांनी कडे करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच सभेत अधिकाधिक भाजप, सेना विचारांच्या कार्यकर्त्यांना आणा, असा सल्ला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आकर्षण दिसून येत आहे. परंतु मोदी यांच्या देशभरातील सभांमध्ये काही घटना घडल्याचे वृत्त आल्याने त्यापार्श्‍वभूमीवर खबरदारीदेखील घेतली जात आहे. काही वर्षांपूर्वी शरद पवार यांच्या सभेत शेतकऱ्यांनी कांदा फेकून रोष व्यक्त केला होता. त्यामुळे हा अनुभव लक्षात घेऊन मोदी यांच्या सभेत असा प्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. भाजपदेखील या विषयावर गंभीर असून, सोमवारी सभा नियोजनाच्या निमित्ताने पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात पालकमंत्री महाजन यांच्यासमवेत कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात सभेच्या नियोजनावर भर देतानाच शेतकऱ्यांनी दिलेले इशारे, तसेच नगर येथील सभेत मोदींचे भाषण सुरू असतानाच नागरिक उठून गेल्याचा संदर्भ देत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सभेचा अंदाज घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी जासुसी करावी, हुल्लडबाजी होऊ नये म्हणून अधिकाधिक भाजप, शिवसेना विचारांच्या लोकांना सभेच्या अग्रस्थानी आणा, सभा सुरू असताना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. काळे कपडे परिधान करून येणाऱ्यांना पोलिसांकडून मज्जाव करण्यात येईलच त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांनी देखील अशा लोकांकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. 

नकारात्मक संदेश नको म्हणून 
नगर व विदर्भातील वर्धा येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू असतानाच नागरिकांनी सभेतून काढता पाय घेतला. याचा नकारात्मक संदेश मतदारांपर्यंत गेल्याने पिंपळगाव बसवंत येथील सभेत असा प्रकार होऊ नये म्हणून सभेभोवती कार्यकर्त्यांचे कडे करण्याच्या सूचना दिल्या. भाषण सुरू असताना लोकांचा बाहेर पडण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना अडविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com