esakal | कापसाच्या पऱ्हाट्यातून मोठी रोजगार निर्मिती 
sakal

बोलून बातमी शोधा

coton

बऱ्याच शेतकऱ्यांनी मशीनद्वारे कापसाचे क्षेत्र खाली केली आहेत. शेत जमीन पूर्णपणे खाली होत असल्याने नांगरटीची कामे सुरू करण्यात आली आहेत. लवकर नांगरटी केल्याने गुलाबी बोंडअळीचा नायनाटही होत असल्याने पुढील लागवडीसाठी लाभ होईल. 
- बापू पाटील, गोवर्धन. 

कापसाच्या पऱ्हाट्यातून मोठी रोजगार निर्मिती 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोवर्धन (ता. अमळनेर) : गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळासह विविध संकटांना सामोरे जात आहेत. अत्यल्प उत्पन्नाने कर्जाच्या खाईत लोटले गेले आहे. त्यातच पिकांची लागवडीखालील शेत क्षेत्र रिकामे करण्यासाठी मजुरीही देणे अवघड आहे. मात्र, सद्यःस्थितीत काही व्यापारी कापसाच्या पऱ्हाट्याची (काड्या) कुट्टी करून विनाशुल्क वाहून नेत असल्याने शेतकऱ्यांचे शेत खाली होत आहेत. या व्यवसायातून मोठी रोजगार निर्मितीही होत आहे. सुमारे पाच लाखांची रोज उलाढाल तालुक्यात होताना दिसून येत आहे. 
तालुक्यात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा ओल्या दुष्काळाने शेतात मेाठ्या प्रमाणात नुकसानही झाले. त्यातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा कापूस ओला पडून नुकसान झाले होते. त्यातच शेतातील पऱ्हाट्या काढून शेत रिकामे कसे करावे ही विवंचना शेतकऱ्यांना सतावते. मजूर लावून शेत खाली करून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडही बसतो. मात्र, सद्यःस्थितीतील शिरपूर तालुक्यातील काही व्यापारी मजूर लावून शेतावरच कापसाची पऱ्हाट्या काढून त्याची मशीनद्वारे कुट्टी करतात. सुमारे ३० मजूर सकाळी सातपासून सायंकाळी पाचपर्यंत हे काम करताना दिसून येत आहेत. यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच शेतकऱ्यालाही विनाशुल्क शेत खाली करून मिळत असल्याने त्यांचा नांगरटीचा मार्ग मोकळा होत आहे. 

विप्रोसह अन्य कारखान्यांना उपयुक्‍त 
शेतातच कापसाच्या पऱ्हाट्या काढून मशीनमध्ये टाकल्या जातात. मशीनमध्ये त्याचा भुसा तयार झाला की तो ट्रकमध्ये भरून त्याची वाहतूक केली जाते. एका ट्रकमध्ये सुमारे दहा टन भुसा भरला जातो. सुमारे बाराशे ते तेराशे रुपये टन हा भुसा विकला जात आहे. परिसरातील विप्रोसह काही कारखान्यांमध्ये बॉयलरमध्ये टाकण्यासाठी या कुट्टीचा वापर केला जात आहे. 

पाच लाखांची रोजची उलाढाल 
अमळनेर तालुक्यातील गोवर्धन, मारवड, कळमसरे, निम आदी परिसरात रोज सुमारे ३० एकर शेती क्षेत्र या व्यवसायातून खाली होताना दिसून येत आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून कुठलीही मजुरी घेतली जात नसल्याने त्यांनाही दिलासा मिळत आहे. सुमारे पाच लाख रुपयांची उलाढाल रोज या व्यवसायातून होत असल्याने अनेकांच्या हातालाही काम मिळाले आहे. त्यातच शेतकऱ्यांचा नांगरटीचाही मार्ग मोकळा होत असल्याने शेतकरी विनाशुल्क काड्या काढताना दिसून येत आहेत.