चार लाखांचे बनावट मीठ पकडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

चाळीसगाव ः शहरातील शुभम प्रोव्‍हीजन येथे तब्‍बल ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे बनावट टाटा कंपनीचे मीठ जप्‍त करण्‍यात आले. ही कारवाई मुंबई येथील आय.पी. इन्व्हेस्टिगेशन डिटेक्‍टीव्‍ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्‍या अधिकाऱ्यांनी आज दुपारी केली. या कारवाईमुळे किराणा दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. 

चाळीसगाव ः शहरातील शुभम प्रोव्‍हीजन येथे तब्‍बल ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे बनावट टाटा कंपनीचे मीठ जप्‍त करण्‍यात आले. ही कारवाई मुंबई येथील आय.पी. इन्व्हेस्टिगेशन डिटेक्‍टीव्‍ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्‍या अधिकाऱ्यांनी आज दुपारी केली. या कारवाईमुळे किराणा दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. 
शहरातील काही दुकानांवर टाटा कंपनीचे बनावट मीठ विक्री होत असल्‍याची माहिती टाटा कंपनीकडे प्राप्‍त झाली होती. त्‍यानुसार शहरातील बसस्‍थानका मागील विनोद पारसमल कोठारी यांच्‍या मालकीच्‍या न्यू शुभम प्रोव्‍हीजनवर इन्व्हेस्टिगेशन डिटेक्टिव्ह प्रायव्हेट लिमीटेडचे अधिकारी मोहम्‍मद हुसेन चौधरी व लक्ष्‍मण विश्‍‍वकर्मा यांनी आज दुपारी अचानक छापा टाकला. यावेळी टाटा सॉल्‍टच्‍या ३९० गोण्‍या आढळून आल्‍या. ज्यात १ हजार ९५० पाकिटे असा जवळपास ३ लाख ९० हजारांचे बनावट पँकिंगचे मीठ जप्‍त केले. जप्‍त करण्‍यात आलेल्‍या मिठाच्या पिशव्या असली पिशव्यांसारख्याच आहेत. त्यातील मिठाच्या रंगात मात्र बदल आढळून आला आहे. याप्रकरणी मोहम्‍मद चौधरी यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून शहर पोलिसात टाटा कंपनीच्‍या स्वामित्व अधिकाराचा उल्‍लंघन करून विक्री केल्‍याप्रकरणी तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. 

दहा ठिकाणीही चौकशी 
इन्व्हेस्टिगेशन डिटेक्‍टीव्ह कंपनीने बनावट मिठाची विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्‍यासाठी टाटा कंपनीसोबत करार केला आहे. त्‍यानुसार, कंपनीचे अधिकारी मोहम्‍मद चौधरी व लक्ष्‍मण विश्‍‍वकर्मा यांनी शहरात मीठ विक्री करणाऱ्या जवळपास आठ ते दहा किराणा दुकानांवर चौकशी केली. त्‍यानुसार ही कारवाई करण्‍यात आली असून अन्‍य ठिकाणी करण्‍यात आलेल्‍या चौकशीतही मिठाचे नमुने घेऊन पुढील कार्यवाही करण्‍यात येईल, अशी माहिती कंपनीचे मोहंमद चौधरी यांनी दिली. दरम्यान, ही कारवाई टाळण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहरात सुरू होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon 4 lakh duplicate salt