हिंदू- मुस्‍लीम एकतेचे प्रतीक; चाळीसगावला उर्साला सुरवात 

chalisgaon bamoshibaba uruse
chalisgaon bamoshibaba uruse

चाळीसगाव :  हिंदू- मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या व शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या येथील बामोशी उर्फ पीर मुसा कादरी बाबांच्या उर्साला सोमवारी पासून सुरवात झाली. आज  पूज्य तलवारीची सवाद्य मिरवणूक निघणार असून यावर्षी तलवारीचे मानकरी राहूल देशमुख ठरले आहेत. दरम्यान, सध्या सर्वत्र ‘कोरोना व्हायरस’ची भीती असल्याने यंदाच्या उर्सावरही त्याचे सावट दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

बामोशी उर्फ पीर मुसा कादरी बाबांचा यंदा ७२३ वा उरूस साजरा होत आहे. हिंदू- मुस्लीम ऐक्‍याचे प्रतीक म्‍हणून हे स्‍थान संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित . उर्स काळात देशभरातून असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. सोमवारी संदल मिरवणुकीने उर्साला सूरूवात झाली. दर्गा परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. याशिवाय नगरपालिका व दर्गा कमेटी ट्रस्टतर्फेही भाविकांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. संपूर्ण उर्स परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी १६ ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. दरम्‍यान, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर भाविकांना दक्षता घेण्याचे आवाहन प्रातांधिकारी श्री. साताळकर यांनी सोमवारी घेतलेल्‍या बैठकीत करुन संबंधितांना आवश्‍यक त्या सूचना दिल्या.

या उर्सात तलवारीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक शहरात येत असतात. आपली मनोकामना पूर्ण झाल्‍यावर दर्ग्यातील पवित्र स्‍थानी चादर अर्पण करतात. या चादरीची ढोल ताशांच्‍या गजरात मिरवणूक काढली जाते. चादरीसोबत शिरनी व गुलाबाची फुले अर्पण केली जातात. त्यामुळे उर्सात लाखो रूपयांची उलाढाल होते. शहरातील नगरपालिकेच्या जुन्या कार्यालयाजवळील देशमुखवाड्यातून पूज्य तलवारीची मिरवणूक निघणार आहे. भाविकांना पूज्य तलवारीचे सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी योग्य त्या उपाययोजना प्रशासनाने केल्या आहेत. यानिमित्ताने दर्ग्याची आकर्षक सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

पालिका प्रशासनातर्फे दर्ग्याच्‍या परिसरातील नदीपात्राची स्‍वच्‍छता करण्यात आली आहे. उरूसात संसारोपयोगी वस्तूंसह पूजेचे साहित्य, खाद्य पदार्थ, खेळणी, खाजासह इतर अनेक वस्तूंची दुकाने थाटली आहेत. उर्समध्ये मुंबई, औरंगाबाद, धुळे, नाशिक, कन्‍नड येथील व्‍यावसायिक झाले आहेत. पाळण्यांबरोबर इतर करमणुकीची साधनेही दाखल झाली आहेत. भाविकांना उन्‍हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

चोरट्यांवर करडी नजर 
उर्सात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, चोरीच्या घटना घडू नये यासाठी पोलिसांची चोरट्यांवर करडी नजर राहणार आहे. गर्दीत साध्या वेशातील पोलिस कर्मचारी तैनात राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी सांगितले. दर्ग्याच्‍या कमानीपासून सहा प्रवेशव्‍दारांवर कॅमेरे लावण्यात आले आहेत. 

चादर विक्रीत लाखोंची उलाढाल 
उर्सकाळात दर्ग्यावर चादर अर्पण करण्याची परंपरा पूर्वीपासून आजतागायत सुरू आहे. चादरींच्या ढोल ताश्‍यांच्‍या गजरात मिरवणुका काढल्या जातात. त्यामुळे चादरीला मोठी मागणी असून लाखो रूपयांची उलाढाल होत असते. संदल मिरवणुकीला शहरातील रथगल्लीतील सलीम शेख यांच्या घरापासून सुरवात झाली. तेथून सराफ बाजारमार्गे दर्ग्यावर रात्री पोचली. यावेळी सलीम शेख, नासीर शेख, नईम शेख, जहांगीर खान, अजिज खाटीक यांच्यासह भाविकांची मोठी गर्दी झाली होती. आज सायंकाळी पाचला तलवार मिरवणूक काढण्यात येणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com