तिकीट कोणालाही द्या, पण जुन्यांपैकीच एकाला...

आनन शिंपी
रविवार, 15 सप्टेंबर 2019

चाळीसगाव ः "विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देताना ज्यांचे पक्षात काहीही योगदान नाही किंवा जे नव्याने पक्षात येऊन काम करीत आहेत, त्यांना देण्याऐवजी आमच्या सारख्या वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या जुन्यांपैकी एकाला द्यावी. आम्ही सर्व जण सर्वस्व पणाला लावून त्याला विजयी करू', अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्यासह येथील जुन्या कार्यकर्त्यांनी थेट मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या कोअर कमेटीकडे नुकतीच केली.

चाळीसगाव ः "विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देताना ज्यांचे पक्षात काहीही योगदान नाही किंवा जे नव्याने पक्षात येऊन काम करीत आहेत, त्यांना देण्याऐवजी आमच्या सारख्या वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या जुन्यांपैकी एकाला द्यावी. आम्ही सर्व जण सर्वस्व पणाला लावून त्याला विजयी करू', अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्यासह येथील जुन्या कार्यकर्त्यांनी थेट मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या कोअर कमेटीकडे नुकतीच केली. त्यामुळे नव्याने पक्षात आलेल्याला भाजपची उमेदवारी मिळाली, तर तिकिटाची मागणी करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांची भूमिका निवडणूक प्रचारात तरी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 
... 
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपतर्फे उमेदवारी मिळावी म्हणून अनेक इच्छुक आहेत. काहींनी तर आपल्यालाच उमेदवारी मिळाल्याचे समजून प्रचारही सुरू केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले उन्मेष पाटील हे खासदार झाल्याने या मतदारसंघात विधानसभेसाठी नवीन उमेदवार पक्षाला द्यावा लागणार आहे. जळगावला पक्षातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या मुलाखतीला इच्छुकांची संख्या पाहता, तिकीट मिळवण्यासाठी जणू चुरसच निर्माण झाली आहे. अशातच भाजपमधील अंतर्गत गटबाजी देखील सध्या उफाळून निघाली आहे. आम्ही सर्व एकच आहोत, असे जाहीररीत्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात "खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे' असे चित्र सध्या दिसून येत आहे. मध्यंतरीच्या काळात पक्षातील विशेषतः जुने पदाधिकारी खासदार उन्मेष पाटील यांच्यापासून दुरावले होते. यातील बरेच जण आता वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने पुन्हा खासदारांसोबत दिसू लागले आहेत. असे असले तरी जे काही इच्छुक विधानसभेच्या तयारीला लागले आहेत, त्यांच्यामुळे ही गटबाजी आता उघडउघड दिसू लागली आहे. अर्थात, प्रत्यक्षात निवडणुकीत या जुन्यांपैकी कोणाची काय भूमिका राहते, यावर पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. 

जुन्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 
चाळीसगाव विधानसभा निवडणुकीत जुन्या पदाधिकाऱ्यांपैकीच एकाला तिकीट मिळावे, अशी मागणी घेऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सतीश दराडे, उद्धवराव महाजन, कैलास सूर्यवंशी, सुरेश स्वार व संभाजी पाटील या आठ जणांनी मुंबईत नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेतली. या भेटीत थेट मुख्यमंत्र्यांकडेच तिकीट देताना जुन्यांचा विचार प्राधान्याने व्हावा, असे आवर्जून सांगण्यात आले. मात्र, याचा अर्थ असा नाही की या सर्वांना नव्यांबद्दल राग आहे. केवळ प्रत्येकानेच इतके वर्षे पक्षात काम केले आहे, देशात व राज्यात कॉंग्रेसची सत्ता असताना मतदारसंघात पक्षसंघटन वाढवले. कधीही पदाची लालसा केली नाही, त्यामुळे आता संधी असल्याने जुन्यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा विचार व्हावा, अशी मागणी पक्षाच्या कोअर कमेटीकडे केली आहे. 

एकदिलाने काम करणार 
या निवडणुकीत जुन्यांपैकी कोणाही एकाला विधानसभेची उमेदवारी मिळाली तर एकदिलाने जिवाचे रान करून त्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत निवडून आणू, अशी भूमिका भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, जुन्यांपैकी अमक्‍यालाच तिकीट मिळावे, अशी कोणाबाबतही मागणी केलेली नाही. तर त्यांच्यापैकी कोणालाही तिकीट मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. ही मागणी रास्त असली तरी ऐनवेळी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, यावर पुढील रणनीती ठरणार आहे. मात्र, भाजपकडून जुन्यांना डावलून एखाद्या नवख्याला उमेदवारी मिळाली, तर त्याचा जुने पदाधिकारी मनापासून प्रचार करतील का? याबाबत साशंकता व्यक्त होणे स्वाभाविक आहे. राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच "कार्यकर्ता हा पक्षाचा आधार आहे. भाजप हा कार्यकर्त्यांची जाणीव ठेवणारा पक्ष आहे' असे सांगून "मागील विधानसभा निवडणुकीत 122 पैकी केवळ 12 आमदार पक्षात नव्याने आलेले निवडून आले होते. त्यामुळे पक्षात नवीन लोकांचा प्रवेश होत असला तरी कार्यकर्त्यांनी बिथरून जाऊ नये, ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे प्रत्येकाला योग्य ते काम दिले जाईल' असे सांगितले आहे. हे पाहता, जुन्यांनी जी तिकिटाची मागणी केली आहे, त्या मागणीचा निश्‍चितपणे विचार होऊ शकतो, असा विश्‍वास भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना वाटतो आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon BJP candidate ticket