गौताळा परिसरात वणवा पेटला 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कन्नड घाटाच्या खाली असलेल्या कंपार्टमेंट नंबर ३१४ बोढरे शिवारात आज पहाटे दोनच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केल्याने डोंगरावर वणव्याचे मोठे लोण पसरले.

चाळीसगाव : बोढरे (ता. चाळीसगाव) शिवारातील गौताळा जंगल परिसरात रात्री दोनच्या सुमारास वनक्षेत्रात मोठी आग लागली. वन विभागाने तब्बल बारा तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. आगीत सुमारे पाच हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. 
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कन्नड घाटाच्या खाली असलेल्या कंपार्टमेंट नंबर ३१४ बोढरे शिवारात आज पहाटे दोनच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केल्याने डोंगरावर वणव्याचे मोठे लोण पसरले. हा प्रकार लक्षात घेता, वन विभागात रोजंदारीवर काम करणाऱ्या ४७ मजुरांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. पहाटेपासून अथक परिश्रम केल्यानंतर आज दुपारी दोनच्या सुमारास आग आटोक्यात आली. बारा तासांच्या आगीत गौताळा परिसरातील जवळपास पाच हेक्‍टर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने जंगलातील मोठ्या झाडांना आगीची झळ बसली नाही. मात्र, गवताचे मोठे नुकसान झाले. 

उन्हामुळे लागली आग 
वातावरणात आठवड्यापासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. तीन दिवसांपासून ४४ ते ४५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद तालुक्यात होत असून अति उन्हामुळे दरवर्षी जंगलात आग लागण्याच्या घटना घडतात. ही आग देखील अशीच लागल्याचा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. 

उन्हाळ्यात वारंवार जंगलात लागणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी वन विभागाकडून जंगल परिसरात दरवर्षी जाळ रेषा निश्‍चित केली जाते. यंदाही ही खबरदारी घेण्यात आली आहे. वन क्षेत्रात पुन्हा पुन्हा आग लागून होणारे नुकसान टाळण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी २४ तास परिसरात पहारा देत असतात. 
- ए. डी. चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), चाळीसगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon gaoitada forest aria fire