गिरणा’चा जामदा डावा कालवा फुटला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 मार्च 2020

जामदा डावा कालव्यावरील जलसेतूची भिंत कोसळल्याचे कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे. उद्या सकाळी मी व अधीक्षक अभियंता त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ. 
- धर्मेंद्रकुमार बेहरे, कार्यकारी अभियंता ः गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव 

भडगाव : गिरणा धरणाचा जामदा डावा कालवा आज दुपारी पाचच्या सुमारास फुटला. गुढे (ता. भडगाव) येथे जलसेतूची भिंत अचानक तुटली. त्यामुळे जामदा बंधाऱ्यातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून रब्बी हंगामाचे शेवटचे आवर्तन लांबण्याची चिन्हे आहेत. कालवा फुटला त्यावेळी तालुक्यात गुढ आवाज झाल्याने या आवाजामुळे जलसेतूची भिंत कोसळल्याची चर्चा सुरू होती. कालवा फुटल्याने कालव्यातून पाणी मोठ्या प्रमाणावर वाया गेले आहे. 

हेपण पहा - मयत खाते धारकांना वारस लावुन कर्जमाफीचा लाभ 

गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन देणे सुरू आहे. आज दुपारी पाचच्या सुमारास अचानक जामदा बंधाऱ्यापासून १३ किलोमीटर अंतरावर गुढे (ता. भडगाव) गावाजवळ नाल्यावरील जलसेतूची भिंत तुटली. त्यामुळे कालव्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून गेले. गिरणा धरणाचा जामदा डावा कालवा सर्वांत जास्त ५६.३३ किलोमीटर लांबीचा असून त्यावर ४१८ किलोमीटर लांबीच्या वितरिका आहेत. त्यावर १८ हजार ६५८ हेक्टर क्षेत्र अंवलबून आहे. मात्र, दुपारी पाचच्या सुमारास अचानक कालव्यावरील जलसेतूची भिंत कोसळल्याने या कालव्यावरील क्षेत्राचा रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. कालवा फुटल्याबरोबर जामदा डावा कालव्याचा बंधाऱ्यातून पाणीपुरवठा गिरणा पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठा बंद केला. डावा कालवा ४३० क्युसेसने सुरू होता. तेवढाच पाणीपुरवठा गिरणा धरणातून कमी करण्यात आल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी सांगितले. जलसेतूच्या दुरुस्तीला १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ दिवसानंतर डावा कालव्यावरील शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल. 

‘ए तो होना ही था....’ 
५६ किलोमीटर लांबीचा गिरणा जामदा डावा कालव्यावर एकूण ४१ तर उजव्या कालव्यावर २८ जलसेतू आहेत. या जलसेतूंच्या बांधकामाला पन्नास वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यामुळे ते केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. पाच- सात वर्षांपूर्वी डावा कालव्यावरील शिंदी गावाजवळील जलसेतूला आवर्तन सुरू असतानाच भगदाड पडले होते. तर उजव्या कालव्यावरील बोरखेडा गावाजवळील जलसेतूही तुटला होता. इतर जलसेतूंची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर या सेतूंवर हीच वेळ येणार आहे. ‘सकाळ’ने याबाबत सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून शासनाला जागे करण्याचे काम केले आहे. 

गूढ आवाज अन् सेतूची भिंत तुटली 
आज दुपारी पाचच्या सुमारास भडगाव तालुक्यात अचानक मोठा गूढ आवाज झाला. त्या आवाजाने खिडक्यांच्या काचांचा आवाज झाल्यासारखे वाटले. त्याच दरम्यान, जलसेतूची भिंत कोसळल्याचे सांगितले जात आहे. जीर्ण झालेला जलसेतूची आवाजाच्या कंपनामुळे भिंत तुटल्याची गुढे परिसरात चर्चा होती. पडायला कारण शोधणाऱ्या भिंतीला गूढ आवाजनिमित्त तर ठरले नाही? मात्र याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही. 
 
जामदा डावा कालवा दृष्टिक्षेपात
- जामदा डावा कालवा लांबी ......... ५६.३६ किलोमीटर 
- वितरिकांची लांबी ................... ४१८ किलोमीटर 
- कालव्यावरील क्षेत्र .................. १८६५८ हेक्टर 
- कालव्यावरील जलसेतूची संख्या ... ४१ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon girna river jamda kalva damage