गिरणापट्ट्यात पावसाचे थैमान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गिरणापट्ट्यात सध्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे पिकांची पूर्णपणे वाट लागली आहे. जास्तीच्या पावसाचा फटका बागायती कपाशीसह सर्वच पिकांना बसला आहे. नगदी पीक हातचे गेल्याने बळिराजा हताश झाला आहे. मातीच्या घरांमध्ये पाऊस मुरत असल्याने काही गावांत घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या. सुमारे दोन तास मुसळधार पाऊस पडला. याचवेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांचे खूपच हाल झाले. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गिरणापट्ट्यात सध्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे पिकांची पूर्णपणे वाट लागली आहे. जास्तीच्या पावसाचा फटका बागायती कपाशीसह सर्वच पिकांना बसला आहे. नगदी पीक हातचे गेल्याने बळिराजा हताश झाला आहे. मातीच्या घरांमध्ये पाऊस मुरत असल्याने काही गावांत घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या. सुमारे दोन तास मुसळधार पाऊस पडला. याचवेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांचे खूपच हाल झाले. 
चाळीसगाव तालुक्‍यात सतत पडणाऱ्या पावसामुळे कपाशी पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. आजही सायंकाळी जोरदार पाऊस पडला. अतिपावसामुळे होत्याचे नव्हते झाले आहे. फुटलेल्या कपाशीच्या बोंडातील कापूस खराब झाला आहे. कैऱ्या सडत असून संपूर्ण परिसरात शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. कपाशी, बाजरी, ज्वारीचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. सततच्या पावसामुळे अनेक शेतांत पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे आता जगावे तरी कसे? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. 

भराडी नाल्याला पूर 
गिरणा परिसरात गेल्या वर्षीपेक्षा यंदा पावसाने शंभरी ओलांडली आहे. मेहुणबारे परिसरात विजांच्या कडकडाटासह सुमारे दीड तास जोरदार पाऊस पडला. रात्री उशिरापर्यंत तो सुरूच होता. चिंचगव्हाण, मेहुणबारे, जामदा, भऊर, वरखेडे, तिरपोळे, धामणगाव, दसेगाव, वडगाव जामदा, कुंझर, दहिवद, भवाळीसह संपूर्ण गिरणापट्ट्यात पावसाने कहर करून थैमान घातले. या पावसाने मेहुणबारे- बहाळ रस्त्यावरील जामदा गावाजवळील भराडी नाल्याला पूर आल्याने कमरेएवढे पाणी आहे. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. त्यामुळे जवळपास तीन तास संपर्क तुटला होता. मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतशिवारावर जणू अस्मानी संकटच कोसळले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसामुळे हिरावला गेल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. 

ब्राह्मणशेवगेत घरे पाण्यात 
ब्राह्मणशेवगे (ता. चाळीसगाव) परिसरात सुमारे दीड तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील राजवाडे भागात अनेक घरांमध्ये पाणी साचले. त्यामुळे संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्य पाण्यात सापडल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. जवळपास तासभर अर्ध्याच्यावर घरांमध्ये पाणी साचून होते. 

वाघळीत घर कोसळले 
वाघळी (ता. चाळीसगाव) गावात आज रात्री दोनच्या सुमारास उत्तम जयराम हाडपे यांच्या मातीच्या राहत्या घरात पाणी मुरल्याने ते कोसळले. घरातील सदस्य झोपेत असताना त्यांच्यावर धाबे कोसळल्याने ते जखमी झाले. 

गिरणा धरणातून विसर्ग वाढवला 
नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण भागात सुरू असलेल्या पावसामुळे आज सायंकाळी सातच्या सुमारास गिरणा धरणाचा पाणी प्रवाह 2 हजार 500 क्‍युसेसवरून तो 7 हजार 500 क्‍युसेस करण्यात आला असून एकूण 10 हजार क्‍युसेस पाणी गिरणा धरणातून सोडले जात आहे. तसेच मन्याड धरणातूनही 2 हजार 500 क्‍युसेस पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन गिरणा पाटबंधारेचे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील यांनी केले आहे. 

बिलाखेड परिसरात वादळामुळे नुकसान 
बिलाखेड (ता. चाळीसगाव) परिसरात आज सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बिलाखेडसह जवळच्या देवळी, आडगाव, पिलखोड, टाकळी प्र. दे., डोणदिगर भागात वादळी पाऊस पडला. या भागात यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर वादळ आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अगोदरच शेतातील कपाशी, ज्वारी, बाजरी व मक्‍याला कोंब फुटले आहेत. त्यात आजच्या वादळामुळे होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी रडकुंडीस आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon heavy rain droped girna river aria