वॉल कंपाऊंड नको, स्थानिकांना नोकऱ्या द्या; ग्रामसभेत मागणी 

chalisgaon gram sabha
chalisgaon gram sabha

खडकी बुद्रूक (ता. चाळीसगाव) : येथील ‘एमआयडीसी’तील गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड कंपनीने गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला वॉल कंपाऊंड बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शाळेला वॉलकंपाऊंड बांधून देण्यापेक्षा कंपनीने गावातील गरजू व बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी काल (२६ जानेवारी) झालेल्या ग्रामसभेत केली. तसा ठरावही सर्वानुमते करण्यात आला. ग्रामसभेला पहिल्यांदा महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी करण्यात आलेल्या ठरावाला उपस्थित महिलांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 


ग्रामपंचायत कार्यालयाजवळील बालभवनात काल (२६ जानेवारी) सकाळी नऊला ग्रामसभा घेण्यात आली. प्रभारी सरपंच मुश्ताक खाटीक अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीस ग्रामविकास अधिकारी के. डी. पाटील यांनी शासनाच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. याशिवाय जल जीवन मिशन अंतर्गत कृती आराखडा तयार करणे, ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी संविधान उद्देशिका वाचन करणे, अंदाजपत्रक सादर करणे, कर आकारणी मुदत संपली असून नवीन कर आकारणी ठरवणे आदी विषयावर चर्चा झाली.

येथील ‘एमआयडीसी’तील गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड कंपनीकडून गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला वॉल कंपाऊंड बांधून दिली जात आहे. या कामाचे नुकतेच भूमीपूजनही झाले. ग्रामस्थांना हा विषय समजला तेव्हा मात्र ग्रामस्थांनी कंपनीने वॉल कंपाऊंड बांधून देण्यापेक्षा शासन निर्णयानुसार स्थानिकांना गुजरात अंबुजा व भारत वायर रोपसह इतर विविध कंपन्यांमध्ये कुशल व अकुशल कामगार म्हणून नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी केली. त्यानुसार, कालच्या ग्रामसभेत हा विषय चर्चेला आल्यानंतर ग्रामस्थांच्या या मागणीला उपस्थित सर्वांनीच प्रतिसाद देत गावाला कुठल्याही कंपनीकडून विकासासाठी आर्थिक सहकार्याची गरज नाही. त्यामुळे रोजगारच उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. या मागणीचा रीतसर अधिकृत ठराव करण्यात आला. ठरावाची प्रत ‘एमआयडीसी’तील कंपनींना देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी के. डी. पाटील यांनी सांगितले. 

ग्रामपंचायतींच्या कामांचे कौतुक 
गावात कर्तव्यदक्ष व धडाडीने काम करणारे ग्रामविकास अधिकारी के. डी. पाटील यांची नियुक्ती झाली आहे. श्री. पाटील यांनी रुजू होताच, गावातील गटारी, स्ट्रीट लाइट व पाणीपुरवठा व्यवस्थापनात स्वतः जातीने लक्ष देऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडवल्या. आल्या आल्या ग्रामस्थांच्या समस्या सुटत असल्याचा अनुभव आल्याने आता गावाचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. ग्रामसभेत माजी ग्रामपंचायत सदस्य गोकूळ कोल्हे यांनी खडकी गाव शहरापासून अवघे चार किलोमीटर असताना सुद्धा विकासापासून वंचित असल्याची खंत व्यक्त केली. ग्रामविकास अधिकारी श्री. पाटील यांच्यामुळेच ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींच्या कामांचे कौतुक केले. 

ग्रामसभेबाबत ग्रामपंचायत सदस्य उदासीन 
ग्रुप ग्रामपंचायतीची सदस्य संख्या सरपंचांसह १३ आहे. असे असताना ग्रामसभेला मात्र सरपंचासह केवळ चारच सदस्य उपस्थित होते. यापूर्वी झालेल्या ग्रामसभांच्या बाबतीतही असेच चित्र दिसून आल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या अनुपस्थित पदाधिकाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. गावातील गंभीर विषयांवर चर्चा केल्या जाणाऱ्या ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणे आवश्‍यक असतानाही ते उपस्थित नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com