चाळीसगावच्या "क्रिश वाईन्स'चा परवाना कायमस्वरूपी रद्द 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मे 2020

जिल्ह्यात गाजलेल्या लॉकडाउन काळात एमआयडीसी चौफुलीवरील आर. के. वाईनच्या मद्यतस्करीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ व शहरातील काही पोलिस कर्मचारी बडतर्फ झाल्यानंतर खळबळ उडाली होती.

जळगाव : चाळीसगाव येथील क्रिश वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. 
जिल्ह्यात गाजलेल्या लॉकडाउन काळात एमआयडीसी चौफुलीवरील आर. के. वाईनच्या मद्यतस्करीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ व शहरातील काही पोलिस कर्मचारी बडतर्फ झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात व्यापक तपासणी मोहीम राबवून संशयित दारू दुकानांवर धाडीही टाकलेल्या होत्या. 
नशिराबाद येथील मे.क्रिश टेडर्स, जळगाव शहरात निलम वाईनवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उचलून परवाने रद्द केले आहेत आता चाळीसगावच्या क्रिश वाईन्सवर निलंबनाची कारवाई आज करण्यात आली. 
राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या निरीक्षकांनी राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षकांच्या आदेशानुसार चाळीसगाव शहरातील क्रिश वाईन्सच्या परवान्याचे व साठ्याचे आणि नोंदींचे निरीक्षण करून 27 एप्रिलला अहवाल वरिष्ठांना सादर केला होता. मे. क्रिश वाईन्सचे मालक दिनेश नोतवाणी व विकी नोतवाणी यांनी लॉकडाउनच्या काळात कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. त्यासाठी विविध मुद्यांवर 9 प्रकारचे आक्षेप या तपासणी अहवालात नोंदविण्यात आले होते. शेरे पुस्तिका नाही, नोकरनामे नाही, देशी-विदेशी मद्य व बिअरच्या साठ्यात तफावत, नोंदवही अद्ययावत नाही, देशी मद्य परवाना परिवहन पास नाही, देशी मद्याचा बेहिशोबी साठा अशा स्वरूपाचे हे आक्षेप होते. 
जळगावातील मद्यतस्करीच्या आर.के. वाईन्स शॉपच्या गुन्ह्यातही दिनेश नोतवाणी आरोपी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मे. क्रिश वाईन्सचे मालक दिनेश नोतवाणी व विकी नोतवाणी यांच्याविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, राज्याचा दारूबंदी कायदा, देशी व विदेशी मद्य परवाना अधिनियमानुसार कारवाई करून हा परवाना रद्द करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon krish wine shop licence cancal