मेहुणबारे, धामणगाव, दरेगावात विकासकामांचे लोकार्पण 

दीपक कच्छवा
बुधवार, 14 मार्च 2018

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या रस्ते विकास निधीतून यावर्षी कोट्यवधींची कामे तालुक्‍यात प्रस्तावित आहेत.

​मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - ​'चाळीसगाव तालुक्‍यातील प्रत्येक गाव मुख्य रस्ता व शहराला जोडले जावे यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या रस्ते विकास निधीतून यावर्षी कोट्यवधींची कामे तालुक्‍यात प्रस्तावित आहेत. अनेक वर्षानंतर ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्गांची दर्जोन्नती करण्यात आली आहे. त्यामुळे येणारे वर्ष खऱ्या अर्थाने रस्ते विकासाचे वर्ष असेल. यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे', असे प्रतिपादन आमदार उन्मेश पाटील यांनी केले. 

मेहुणबारे, धामणगाव व दरेगाव येथील विविध विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धर्मा वाघ, जिल्हा परिषदेच्या सदस्या मोहिनी गायकवाड, पंचायत समितीच्या सदस्या रूपाली साळुंखे, भाजपचे गटप्रमुख भैय्या वाघ यांच्यासह परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. मेहुणबारे येथे चौदाव्या वित्त आयोगातून अंगणवाड्या, रस्ते कॉक्रिटीकरण आदी विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन करण्यात आले. धामणगाव येथे रस्ता डांबरीकरणाचे भूमीपूजन, गावांतर्गत रस्ता कॉक्रेटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. 

नाशिक जिल्ह्याला जोडणारा पूल पूर्ण 
चाळीसगाव तालुक्‍याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या दरेगाव गावातून सेवानगरमार्गे पिलखोड (ता. चाळीसगाव) व मालेगाव (जि. नाशिक) जाण्यासाठी अत्यंत सोयीचा रस्ता पूर्ण करण्यात आला. काही वर्षांपूर्वी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्याचे भाग्य बदलले असून आमदार उन्मेश पाटील यांनी आपल्या जन्मभूमीचे पांग फेडत, या रस्त्याची दुरुस्ती मागील वर्षात केली आहे. याच रस्त्यावर भालकोट मंदिराजवळ नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात हा मार्ग बंद पडत होता. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना नाइलाजाने दहा किलोमीटरचा फेरा पार करावा लागत होता. आमदार उन्मेश पाटील यांनी दरेगाव- सेवानगर रस्त्यावरील भालगोट मंदिराजवळ पुलासाठी 75.85 लाख रुपये मंजूर करून मागीलवर्षी त्याचे भूमिपूजन देखील केले होते. एकाच वर्षात हे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

Web Title: marathi news chalisgaon north maharashtra development projects