कृष्णापुरीवासीयांसाठी रूपसिंग जाधव ठरले जलदूत 

दीपक कच्छवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

ग्रामस्थांची तहान भागवत असल्याचे मला मनस्वी समाधान आहे. माझे नुकसान झाले तरी चालेल, परंतु माझ्या विहिरीला पाणी आहे तोपर्यंत मी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करू देणार नाही. ग्रामस्थांचा आशीर्वाद राहिला तर निश्‍चितच मला चांगले फळ मिळेल. 
- रूपसिंग जाधव, ग्रामपंचायत सदस्य, लोंढे कृष्णापुरी तांडा.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव): आपल्या शेतातील स्वतःची भेंडी व चवळीचे पीक बकऱ्यांना चारून ग्रामस्थांना पिण्याच्या पाणी मिळावे म्हणून कृष्णापुरी (ता. चाळीसगाव) ग्रामपंचायतीचे सदस्य रूपसिंग जाधव यांनी आपल्या विहिरीचे पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीत टाकून ग्रामस्थांची तहान भागवली आहे. त्यामुळे रूपसिंग राठोड हे तांडावासीयांसाठी जलदूत ठरले आहेत.

कृष्णापुरी तांड्याची सुमारे 1 हजार 750 लोकसंख्या आहे. जवळच असलेल्या कृष्णापुरी धरणात पाणीसाठा सद्यःस्थितीत शिल्लक नसल्याने "धरण उशाला कोरड घशाला' अशी परिस्थिती तांडावासीयांची झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करीत भटकंती करावी लागत होती. अशा परिस्थिती ग्रामपंचायतीचे सदस्य रूपसिंग जाधव यांनी तांडावासीयांची पाण्यासाठी होणारी वणवण लक्षात घेता, कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता स्वतःच्या शेतात लागवड केलेली भेंडी व चवळीच्या पिकाला पाणी देणे गरजेचे असताना त्याला पाणी न देता, आपल्या विहिरीतील पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीत टाकून ग्रामस्थांची तहान भागविण्याचा निर्णय घेतला. कृष्णापुरी धरणाच्या जवळच ग्रामपंचायतीची विहीर व रूपसिंग जाधव यांचे शेत आहे. शेतातच विहीर असून दिवसभरात टप्याटप्याने तीन तास विहिरी चालते. त्यांच्या विहिरीतील पाणी सहाशे मीटर पाइप जोडून ग्रामपंचायतीच्या विहिरीत त्यांनी टाकला. ज्यामुळे या विहिरीतून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणे शक्‍य झाले. 

एक लाखाचे उत्पन्न सोडले 
रूपसिंग जाधव यांनी आपल्या सहा एकर शेतात तीन एकर भेंडी व दोन एकर चवळीची लागवड केली आहे. मात्र, ग्रामस्थांचे पाण्यापासून होणारे हाल पाहून त्यांनी भेंडी व चवळीच्या शेतात बकऱ्या चारल्या. ज्यामुळे रूपसिंग जाधव यांचे एक लाखाच्या घरात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आपल्या विहिरीतील पाणी पिकांना न देता, ग्रामस्थांना दिल्याने त्यांच्या या दातृत्वाचे कौतुक होत आहे. 

एप्रिल, मे महिन्यात कसे होणार? 
मार्च महिन्यात सुरवातीलाच कृष्णापुरी तांड्यातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. सध्या रूपसिंग राठोड यांच्या रूपाने जलदूत गावाला लाभला आहे. असे असले तरी विहिरीतील पाणी संपल्यानंतर एप्रिल व मे महिन्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यावर कसे होणार? ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, कृष्णापुरी धरणात "गिरणा' धरणातून पाणी टाकावे, अशी मागणी होत आहे. 

Web Title: marathi news chalisgaon north maharashtra news