कांदा रडवतोय...गृहिणी अन्‌ शेतकऱ्यालाही! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

चाळीसगाव : यंदा झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली आहे. कांद्याने प्रतिक्‍विंटल पाच हजारांचा भाव गाठला आहे. भाववाढीबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरीही माल शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. 

चाळीसगाव : यंदा झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली आहे. कांद्याने प्रतिक्‍विंटल पाच हजारांचा भाव गाठला आहे. भाववाढीबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरीही माल शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. 
चाळीसगाव येथील नागदरोड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून उपबाजार समितीत सुरू करण्यात आलेल्या कांद्याच्या स्वतंत्र लिलावामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. ऐरवी नांदगाव, मालेगाव, नाशिक यासह अन्य ठिकाणी विक्रीसाठी जाणारा कांदा आता चाळीसगाव उपबाजार समितीतच खरेदी करण्यात येत असतो. मागील महिन्यात कांद्याची काही अंशी आवक वाढली होती. यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणल्याने बाजारातील भावही गडगडले होते. शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. परंतु गेल्या आठवडाभरापासून कांद्याची भाववाढ झाली आहे. मागील आठवड्यात पंधरा ते दोन हजार रूपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे जाणारा कांदा या आठवड्यात तब्बल 3 ते 5 हजार रूपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विक्री करण्यात येत आहे. 

आवक केवळ पाच टक्‍के 
लग्नसराईमुळे कांद्याची मागणी वाढली असताना साठवणुकीतील उन्हाळा कांदाही शेतकऱ्यांकडे आता शिल्लक नाही. तसेच नवीन लाल कांदा हा परतीच्या अवकाळी पावसामुळे खराब झाला असून बाजारात सिझनमध्ये होणाऱ्या दोनशे ते अडीचशे वाहनांची आवक आता केवळ 8 ते 10 वाहनांवर येऊन ठेपली आहे. यामुळे खरेदीदार व्यापाऱ्यांची संख्या देखील रोडावली आहे. कांद्याचे भाव गगनाला भिडत असताना कोबीची मागणी वाढली असून हॉटेलसह अन्य ठिकाणी कांद्याऐवजी गडा कोबीचा वापर करण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच 
यंदा सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे शेतकऱ्यांना कांद्याचे उत्पन्न चांगल्या प्रकारे होणार होते. परंतु ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. आता कांद्याला चांगला भाव असला तरीही शेतकऱ्यांजवळ कांदा शिल्लक नसल्याने भाव वाढून काय उपयोग असे म्हणत शेतकरयांच्या पदरी निराशाच पडली आहे. 

मागील वर्षी या महिन्यात कांद्याचे भाव हजार रूपये प्रतिक्विंटल होते. परंतु यंदा आवक घटल्याने कांद्याचे भाव ते हजार रूपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे झाले आहेत. साधारण एक महिना हे भाव स्थिर राहण्याची शक्‍यता असून नवीन माल आल्यानंतर काही अंशी कांद्याच्या भावात घसरण होईल. 
-नितीन चौधरी, कांदा व्यापारी चाळीसगाव 

-अशी आहे आकडेवारी 
-सध्या कांद्याचे होलसेल दर - 3 ते 5 हजार रूपये प्रतिक्‍विंटल 
-उपबाजार समितीत असलेले कांदा व्यापारी - 15 
-सिझनमध्ये कांदा बाजारात होणारी उलाढाल - जवळपास 10 ते 15 लाख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon onion rate