चाळीसगाव शिवसेना प्रमुखावर प्राणघातक हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

जुन्या वादातून शहर शिवसेना प्रमुख शामलाल कुमावत यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ज्यात ते गंभीर जखमी झाले. 

चाळीसगाव - जुन्या वादातून चाळीसगाव शहर शिवसेना प्रमुख तथा नगरसेवक शामलाल कुमावत यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दोघांवर पाचे ते सात जणांच्या जमावाने आज दुपारी बाराच्या सुमारास जीवघेणा हल्ला केल्याची घटना शहरातील धुळे रोडवरील मोठ्या कॉलेजसमोर घडली. 

याबाबत माहिती अशी की, शिवसेनेचे शहर प्रमुख शामलाल कुमावत आपले सहकारी युवराज कुमावत व नीलेश गायके यांच्यासोबत एका ठिकाणी घरभरणीच्या कार्यक्रमासाठी धुळे रोडकडे गेलेले होते. तेथून परत येत असताना चाळीसगाव महाविद्यालयाजवळ त्यांची गाडी रोखून चार ते पाच जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात शामलाल कुमावत यांच्या डोक्‍याला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यासोबतच्या दोघांनाही जबर मारहाण करण्यात आली. शामलाल कुमावत यांच्या डोक्‍यातून रक्तस्राव होत असल्याने त्यांना तातडीने डॉ. देवरे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. युवराज कुमावत व नीलेश गायके यांच्यावरही याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, एका नगरसेवकासोबत असलेल्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: marathi news chalisgaon shivsena city president shamlal kumavat attack