चाळीसगाव तालुका कोरोनाच्या विळख्यात; नागरिकांनो सावध व्हा, नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

चाळीसगाव तालुक्यात आता चोहीबाजुने कोरोनाचे मोठे सावट आहे.मालेगाव, पाचोरा, अमळनेर येथे दररोज कोरोनाचे रूग्ण आढळुन येत असले तरी चाळीसगाव तालुक्यात अद्याप प्रशासनासह, पोलीस यंत्रणेसह, आरोग्य विभागाने सुस्कारा सोडला

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : -खान्देशात कोरोना विषाणुने कहर केला आहे. मालेगाव, धुळे, जळगाव, अमळनेर,पाचोरा येथे कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे.मालेगाव शहरांसह लगतच्या गावांमध्येही कोरोना विषाणुुंचा प्रादुर्भाव झालेल्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.तालुक्याला आता कोराताने आजुबाजुला वेढला गेला असुन चाळीसगावकरांनी सतर्क होण्याची गरज आहे.त्यामुळे नागरीकांनो सावधान कोराना दाराशी उभा आहे.

चाळीसगाव तालुक्यात आता चोहीबाजुने कोरोनाचे मोठे सावट आहे.मालेगाव, पाचोरा, अमळनेर येथे दररोज कोरोनाचे रूग्ण आढळुन येत असले तरी चाळीसगाव तालुक्यात अद्याप प्रशासनासह, पोलीस यंत्रणेसह, आरोग्य विभागाने सुस्कारा सोडला असला तरी खरेदीच्या निमीत्ताने शहरात दररोज ज्या प्रकारे गर्दी होत आहे ते पाहता नागरीकांना सजगता बाळगली नाही तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

सोशल डीस्टींगचा फज्जा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. मात्र अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली अनेक नागरीक घराबाहेर पडत असून शहरात गर्दीने रस्ते ओसांडून वाहत आहेत.कोेरोनाची कुठलीही भिती नागरीकांना नाही. भाजीपाला, किराणा दुकाने, बँकांसमोर नागरीकांची होणारी गर्दी पाहता सोशल डिस्टन्सचा पुरता बोऱ्या उडाला आहे. अत्यावश्यक सेववांच्या नावाखाली नागरीक वारंवार बाहेर पडत आहेत.दुचाकी वाहनांच्या वापरास बंदी असूनही सर्रास दुचाकी,चारचाकी वाहने रस्त्यावर धावत आहेत.

चाळीसगावच्या दाराशी कोराना
मालेगाव, अमळनेर व  पाचोरा या शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ही शहरे चाळीसगावपासून जवळ आहेेत.  एकप्रकारे तालुक्याला कोरोनाचा विळखाच आहे.थोडीसीही चूक आतापयर्त न घडलेल्या गोष्टीला कारणीभूत ठरू शकते.कोरोना चाळीसगावच्या दाराशी येवून पोहचला आहे.कधी तो घाव घालेल याचा भरोसा नाही. त्यामुळे तालुका प्रशासन व पोलीस, आरोग्य यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करीत असली तरी काही बेजबाबदार लोकांमुळे चाळीसगावात कोरोना कधी प्रवेश करेन हे समजणारही नाही. 

पोलीसांकडून कारवाई
कोरोनाला रोखण्यासाठी नागरीकांनी रस्त्यावर गर्दी करू नये हाच हा सर्वात चांगला उपाय आहे.संचारबंदीत गर्दी होवू नये म्हणून पोलीसांकडून कारवाई होत आहे.आतापर्यत अनेक जणांवर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.एवढे होवूनही कलम 188 चे अस्त्र उपयोगात पडत नसल्याचे एकंदरीत चित्र तालुक्यात दिसून येत आहे.नियम तोडला की संबंधीत व्यक्ती गुन्हा दाखल करण्यास पात्र ठरते त्यामुळे या कलमाचा प्रभावी वापर होणे शहराच्या तसेच तालुक्याच्या हिताचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon taluka vicinity of the corona virus precautions people