चीन-रशियामध्ये नववर्ष जल्लोषासाठी द्राक्षमळे फुलले 

residentional photo
residentional photo

 
नाशिक ः चीन-रशियामध्ये नववर्षाच्या स्वागतावेळी चांगला भाव मिळतो म्हणून बारामती-भिगवण मार्गाबरोबर फलटण आणि सटाणा भागातील शेतकऱ्यांनी द्राक्षमळे फुलवले. विशेषतः काळ्या वाणाच्या द्राक्षाला बांधावर दीडशे ते पावणेदोनशे रुपये किलो असा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी गेल्या महिन्याखेर बागांची छाटणी केली. अशा बागांच्या फेरफूटी शेतकऱ्यांनी काढल्या असून या बागा सध्या चांगल्या स्थितीत आहेत. 
चिली, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेतून चीनमध्ये द्राक्षांची आयात होते. थंडी अधिक असल्याने चीनमध्ये फळांचे उत्पादन होत नसल्याने अधिक द्राक्षांची आयात केली जाते. अधिक साखर आणि काळा रंग याला विशेष पसंती मिळते. गेल्यावर्षीपासून शेतकऱ्यांनी चीनबरोबरच रशियामध्ये अर्ली द्राक्षे पाठवण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्रातील त्यासाठी दोन हजार हेक्‍टरवर अशा द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. दरम्यान, एकदम द्राक्षे बाजारात येऊन भाव पडू नयेत म्हणून पुण्याच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातर्फे शेतकऱ्यांचा कल अर्ली छाटणीकडे वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र गेल्यावर्षी ऑक्‍टोंबरऐवजी 1 ते 20 सप्टेंबरला गोड्या बहराच्या छाटणी केलेल्या बागांचे परतीच्या पावसाने नुकसान केले. शिवाय गेल्यावर्षी उशिरा छाटलेल्या बागांमधील द्राक्षांना शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. 

रमजान डोळ्यापुढे ठेवत नियोजन 
मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान डोळ्यापुढे ठेऊन शेतकरी छाटणीचे नियोजन करत आहेत. त्यामुळे ऑक्‍टोंबरऐवजी यंदा बागांची गोड्या बहराची छाटणी 15 नोव्हेंबरपर्यंत चालण्याची चिन्हे शेतकऱ्यांच्या नियोजनातून डोकावत आहेत. अरब राष्ट्रांमध्ये चांगला भाव मिळेल यादृष्टीने शेतकऱ्यांनी छाटणीच्या बदलेल्या वेळापत्रकाचे सूत्र आहे. गोड्या बहराच्या छाटणीसाठी तयार झालेल्या बागांना यंदा पाऊस लांबल्याने सूर्यप्रकाश चांगला मिळाला. त्यामुळे काड्या पक्व होण्यास मदत झाली आहे. 


""राज्यात दहा ते पंधरा टक्के बागांची अर्ली छाटणी होते. यंदा 20 ते 25 टक्के बागांमध्ये ही छाटणी अपेक्षित आहे. खरे म्हणजे, अर्ली छाटणी केल्यावर पावसाचा त्रास होत असल्याने शेतकरी जोखीम पत्करुन उत्पादन घेतात. बागांची छाटणी झाल्यावर 30 ते 35 दिवसामध्ये पावसाचा त्रास व्हायला नको असतो. नोव्हेंबरमध्ये पाऊस झाला, तरी त्याचा बागांना फारसा त्रास होत नाही.'' 
- डॉ. एस. डी. सावंत (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे) 
 

 
""द्राक्षांचे यंदा "बंपर' उत्पादन अपेक्षित आहे. पण यापूर्वीचा अनुभव फारसा चांगला नाही. "बंपर' उत्पादनाच्या अपेक्षा उंचावलेल्या असताना कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी भाव कोसळल्याच्या घटनांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. परतीच्या पावसानंतरही ऑक्‍टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही सारी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी द्राक्ष उत्पादनाची तयारी केली आहे.'' 
- कैलास भोसले (द्राक्ष उत्पादक, नाशिक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com