residenational photo
residenational photo

चित्रनगरीच्या उभारणीसाठी पाठपुराव्याची गरज 

नाशिक, गोरेगावच्या धर्तीवर नाशिकला चित्रनगरीची उभारणी करण्यात यावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ईगतपुरी तालुक्‍यातील मुंढेगाव येथे चित्रनगरीसाठी जागाही देण्यात आलेली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत बैठक घेऊन चित्रनगरीचा व्यवहार्यता अहवाल पुन्हा नव्याने तपासण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र अजूनही चित्रनगरीच्या प्रत्यक्ष उभारणीसाठी मुहुर्त लागत नसल्याने नाशिककरांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

   
चित्रनगरीसाठी सातत्याने पाठपुरावा करत हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरत आहे. 
चित्रपटमहर्षी म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये चित्रनगरी व्हावी, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यानुसार 2009 मध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून नाशिक विकास कार्यक्रमांतर्गत चित्रनगरीला मंजूरी देण्यात आली होती.

 ईगतपुरी तालुक्‍यातील मुंढेगाव येथे स.नं. 459 क्षेत्र 54.58 हेक्‍टर आर या जागेबाबत सविस्तर माहितीसह अहवाल महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाला सविस्तर अहवाल सादर केलेला आहे. त्यानंतर ही जागा सांस्कृतिक कार्य विभागाच्या नावे हस्तांतरीत करण्याकरिता महसूल व वन विभागास प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. मिटकॉन या संस्थेमार्फत चित्रनगरीची व्यवहार्यता तपासण्यासाठी अहवाल तयार करण्यात आला होता व तो 2012 मध्ये शासनाला सादरही करण्यात आला होता. 

आमदार जयवंत जाधव यांनी विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात चित्रनगरीच्या विषयावर प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावेळी अधिवेशन संपल्यानंतर या विषयावर बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये तांत्रिक बाजू पुन्हा नव्याने तपासण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शासनदरबारी अजूनही हा प्रश्‍न रेंगाळतच पडला आहे. 
दळणवळणाच्या आधुनिक सोयीसुविधांमुळे नाशिक आणि मुंबई हे अंतर अवघ्या तीन तासांत कापता येते. तसेच नाशिकला नागमोडी रस्ते, नैसर्गिक संपन्नता, कलावंतांची उपलब्धता यासारख्या अनेक गोष्टी अनुकूल आहे. त्यामुळे चित्रनगरीचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी व्यवहार्यता अहवाल पुन्हा तपासण्याच्या सूचना दिल्या. दळणवळणाच्या सोयीमुळे नाशिक-मुंबई अंतर अवघ्या अडीच ते तीन तासांवर आले आहे. चित्रनगरीसाठी जी जागा निश्‍चित केली आहे ती निसर्गसौंदर्याने नटलेली आहे. त्यामुळे शासनाचा हा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावावा. 
- आमदार जयवंत जाधव 

दादासाहेब फाळकेंच्या जन्मभूमीत चित्रनगरी व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. नाशिकला निसर्गसौंदर्य भरपूर आहे. तसेच या ठिकाणी कलावंतांची देखील मोठी उपलब्धता आहे. मुंढेगावला चित्रनगरी उभारल्यास मुंबई आणि नाशिककरांच्या दोघांच्या दृष्टीने ती सोयीची होणार आहे. त्यामुळे पर्यटनवाढीला चालना मिळेल तसेच रोजगारसुद्धा निर्माण होणार आहे. 
- शाम लोंढे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com