नाचक्कीनंतर शिक्षकांकडून पैठणीची होळी! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

धुळे ः नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकींतर्गत विविध प्रलोभनातून मतदारांवर भुरळ टाकण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील एका धनवान उमेदवाराच्या अंगलट येऊ लागला आहे. शिक्षक मतदारांवर पैठणीसह साड्यांचा वर्षाव त्याने सुरू केला, मात्र, यातून प्रथम या घटकाची नाचक्की, नंतर स्वाभिमान, आत्मसन्मान दुखावत असल्याची जाणीव काही शिक्षकांना झाल्याने येथील जिल्हा क्रीडा संकुलाजवळ मंगळवारी (ता. 19) रात्री संतप्त शिक्षकांनी पैठणीची होळी केली. यापाठोपाठ तळवे (ता. तळोदा, जि. नंदुरबार) येथील माध्यमिक विद्यालयात आलेल्या साड्यांचीही होळी करण्यात आली.

धुळे ः नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकींतर्गत विविध प्रलोभनातून मतदारांवर भुरळ टाकण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील एका धनवान उमेदवाराच्या अंगलट येऊ लागला आहे. शिक्षक मतदारांवर पैठणीसह साड्यांचा वर्षाव त्याने सुरू केला, मात्र, यातून प्रथम या घटकाची नाचक्की, नंतर स्वाभिमान, आत्मसन्मान दुखावत असल्याची जाणीव काही शिक्षकांना झाल्याने येथील जिल्हा क्रीडा संकुलाजवळ मंगळवारी (ता. 19) रात्री संतप्त शिक्षकांनी पैठणीची होळी केली. यापाठोपाठ तळवे (ता. तळोदा, जि. नंदुरबार) येथील माध्यमिक विद्यालयात आलेल्या साड्यांचीही होळी करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांतील शैक्षणिक वर्तुळात या प्रकाराची दिवसभर चर्चा रंगली. 

येथील काही भागात उद्या (ता. 21) पैठणीची होळी करण्याचे नियोजन शिक्षक मतदारांनी केले आहे. तसेच मौलिक पाकिटांचे वाटप सुरू झाल्यास तेही जाळून टाकण्याचा निर्णय अनेक शिक्षक मतदारांनी घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण तापले आहे. 
 
मतदारांना प्रलोभन 
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक राजकीय पक्षांनी "हायजॅक' केली असून काही धनवान उमेदवारांकडून शिक्षक मतदारांना प्रलोभने दिली जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील एका धनवान उमेदवाराने थेट पैठणी, इतर प्रकारची साडी मतदारांना घरपोच पाठविणे सुरू केले आहे. पाचशेच्या सहा नोटांचे पाकीट पोच होऊ लागले आहे. शिक्षक मतदारांना ओल्या पार्ट्याही दिल्या जात आहेत. 
 
धुळ्यात रात्री होळी 
धुळ्यात पैठणी वितरणाची जबाबदारी असणाऱ्या त्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याला मंगळवारी सायंकाळनंतर क्रीडा संकुलाजवळ काही शिक्षक मतदार भेटले. त्याने त्याच्या हाती पैठणी साडी सोपविली आणि धनवान उमेदवाराला मत देण्याची गळ घातली. या प्रकारामुळे संबंधित शिक्षक मतदारांचा स्वाभिमान दुखावला. त्याने तेथेच आत्मक्‍लेषातून सर्वांसमक्ष पैठणीची होळी केली. या प्रकारामुळे बघ्यांची गर्दी झाली. वास्तव स्थिती समजल्यानंतर अनेकांनी निवडणुकीतील गैरप्रकाराचा निषेध नोंदविला आणि पैठणीची होळी करणाऱ्या मतदाराला दाद दिली. सी. एन. देसले, विनोद पवार, बी. बी. सयाईस, भगवान पाटील, एन. यू. ठाकरे, आर. आर. साळुंके, जी. एस. बोरसे आदी उपस्थित होते. 
 
तळवेला उमटले पडसाद 
साड्या वाटून शिक्षक मतदारांकडे मते मागणाऱ्यांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत तळवे येथे साड्यांची होळी करण्यात आली. मतदार जागा झालाय, विकला जाणार नाही, तर विकत घेणाऱ्यांना धडा शिकवेल, अशी भूमिका मांडत माध्यमिक विद्यालयातील महिला, पुरुष शिक्षकांनी धनवान उमेदवाराने पाठविलेल्या साड्या, इतर साहित्याची होळी केली. 
 
नाचक्कीनंतर शहाणपण... 
निवडणुकीत प्रलोभनातून पैठणी, पाकिटे वाटप सुरू झाल्याचा गंभीर प्रकार प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियामुळे समोर आला. त्यातून शिक्षकांची नाचक्की होऊ लागल्याने पैठणीच्या होळीतून शहाणपण सुचल्याचे दिसून येत आहे. होळीनंतर शिक्षक मतदार मतदानाच्या दिवशी नेमकी काय भूमिका बजावतात? प्रलोभने दाखविणाऱ्यांना जागा दाखवितात कि त्यांच्याच पाठीशी उभे राहतात हे निकालावेळी दिसून येईल.

Web Title: marathi news chule teacher paithani holi