चित्रपटातील हा विनोदी कलाकार पोट भरण्यासाठी नाचतोय जत्रेत

altaf shekh dubrya
altaf shekh dubrya

सारंगखेडा : ‘ढोंगी ढोंगी नाच मना दाजिबा...’ गीत अन् ‘डुबऱ्या भाईजान’सारख्या अहिराणी चित्रपटात गाजलेल्या खानदेशातील नावाजलेल्या अल्ताफ शेख; ज्याला ‘डुबऱ्या’च्या नावाची ओळख... त्याचा चित्रपट अन् गीतामुळे कॅसेट कंपनी करोडपती झाली. पण, ‘डुबऱ्या’वर उपासमारीची वेळ आली आहे. कामासाठी येथील यात्रोत्सवात आला असून, तरुणांसाठी आकर्षण ठरला आहे. 

काही वर्षांपूर्वी सीडी, कॅसेटच्या जमान्यात खानदेशातील कलाकारांना चांगले दिवस आले होते. अहिराणी गाणी व चित्रपट पाहणाऱ्यांचा वर्ग मोठा होता. सीडी, कॅसेट खरेदी करून घरात बसून चित्रवाहिन्यांसमोर मित्रपरिवारसह चित्रपट पाहण्याचा आनंद घेत असत. त्यात अहिराणी गाणी, विनोदी अहिराणी चित्रपटांची आवड प्रेक्षकांना होती. त्यावेळी एरंडोल येथील अल्ताफ शेख इस्माईल शेख (वय ४८) याने खानदेशच्या निर्मात्यांच्या मदतीने ‘ढोंगी ढोंगी नाच मना दाजिबा...’ या अहिराणी गीतावर खानदेशी अभिनेत्री पुष्पा ठाकूरसोबत नृत्य करून खानदेशच नव्हे; तर गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील प्रेक्षकांच्या गळ्याचा तो ताईत बनला. त्यानंतर ‘डुबऱ्या भाईजान’, ‘डुबऱ्या नंबर-१’, ‘डुबऱ्या एमबीबी एस’, ‘तीन तिघाड्या काम बिघाड्या’, ‘डुबऱ्या और गब्बार’, ‘हनुमान की कमाल डुबऱ्या की धम्माल’ अशा अनेक चित्रपटांत काम केलेल्या अल्ताफ शेख याच्यामुळे सीडी बनविणाऱ्या कंपन्या, दिग्दर्शक, निर्माते, कलाकार लखपती झाले. पण, अल्ताफ ऊर्फ डुबऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अल्ताफची उंची दोन फूट ३३ इंची एवढी आहे. तो भारतात ‘गिनीज बुक नोंद’मध्ये दुसऱ्या स्थानी आहे. उंचीने कमी असल्यामुळे काम करता येत नाही, म्हणून रोजंदारीवर येथील ‘चेतक फेस्टिव्हल’मध्ये असलेल्या धुळ्यातील विजय पवार यांच्या ‘खवय्या वेदकॅटर्स’वर तो बालगोपाळांची करमणूक करीत आहे. अन्य दिवशी धार (ता. अमळनेर) येथील दर्ग्याजवळ पूजासाहित्य विक्रीचा व्यवसाय करून उपजीविका चालते. पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. 

असा आला चित्रपटात... 
अल्ताफचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. उंची कमी असल्यामुळे तरुण वयात कामधंदा, नोकरीपासून वंचित होता. धार (जि. जळगाव) येथे ‘उरूस’मध्ये ‘डान्स पार्टी’चा खेळ जोमात होता. अल्ताफ उंचीने कमी असल्याने तो सगळ्यांचा परिचित होता. डान्सच्या खेळात एका पोलिस अधिकाऱ्याने नृत्यांगणाला आव्हान देत सोबत अलल्ताफशी जुगलबंदी लावली. त्यात अल्ताफ भारी पडला. त्यावेळी एका अहिराणी गाणी बनविणाऱ्या निर्मात्यांचे लक्ष गेले. त्याने अल्ताफशी एका गाण्यासाठी शूटिंगला घेऊन पुष्पा ठाकूरसोबत ‘ढोंगी ढोंगी नाच मना दाजिबा...’ गीताचे चित्रीकरण केले. त्यावेळी एकही रुपया मिळाला नाही. पण, या गीताने अख्ख्या महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशात युवकांना वेड लावले. त्यानंतर अनेक व्हिडिओ कॅसेट कंपन्यांनी अल्ताफचा शोध घेत चित्रपट, गाणी तयार केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com