आयुक्तांच्या वादग्रस्त कारवाईला अखेर मुख्यमंत्र्यांची लेखी स्थगिती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

नाशिक :  सिडकोतील वाढीव बांधकामांवर अतिक्रमण कारवाई करण्यासाठी सरसावलेल्या महापालिका प्रशासनाला आता कारवाईला स्थगिती देण्याचे लेखी आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून महापालिका प्रशासनाकडे उद्यापर्यंत लेखी आदेश पोहोचतील अशी माहिती आमदार सिमा हिरे यांनी दिली.

नाशिक :  सिडकोतील वाढीव बांधकामांवर अतिक्रमण कारवाई करण्यासाठी सरसावलेल्या महापालिका प्रशासनाला आता कारवाईला स्थगिती देण्याचे लेखी आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून महापालिका प्रशासनाकडे उद्यापर्यंत लेखी आदेश पोहोचतील अशी माहिती आमदार सिमा हिरे यांनी दिली.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वॉक विथ कमिशनर उपक्रमात मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश नसल्याने कारवाई करणारचं अशी भुमिका मांडली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला लेखी आदेश काढण्याचे सुचित केले आहे. 
सिडकोतील 24 हजार 518 घरे रडारवर घेत ड्रेनेज, नाले तसेच वाढीव बांधकाम केलेल्या घरांवर महापालिकेच्या नगररचना विभागाने लाल रेषेने रेखांकन करण्यास सुरुवात केल्याने सिडकोतील नागरिक भयभीत झाले होते.

बहुतांश कामगार वसती असलेल्या सिडकोत पुन्हा घर बांधणे शक्‍य होणार नसल्याने नागरिक एकवटचं पालिकेच्या रेखांकनाच्या कारवाईला विरोध केला होता. नागरिकांचा रोष बघता सिडको संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्र्यांपर्यंत गाऱ्हाणे मांडत स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी देखील तोंडी आदेश दिले परंतू आयुक्त मुंढे यांनी लेखी आदेश नसल्याने कारवाई करण्याचे सुचित केले होते.

मुख्यमंत्र्यांनी आदेश देवूनही आयुक्तांची वाढीव बांधकामे तोडण्याची भुमिका कायम ठेवल्याने सिडकोचे नागरिक कधीही घरांवर हातोडा पडेल या भितीने धास्तावले होते. आज मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आमदार सिमा हिरे यांनी भेट घेत, परिस्थिती कानावर घातली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगितीची लेखी आदेश काढण्याच्या सुचना दिल्याची माहिती आमदार हिरे यांनी दिली. नगर विकास विभागामार्फत महापालिकेला उद्यापर्यंत आदेश प्राप्त होतील असेही त्यांनी सांगितले. दरम्यान तोंडी आदेश देवूनही लेखी स्थगिती आदेशाची मागणी करणारे आयुक्त मुंढे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्याचे मानले जात आहे. 
 

Web Title: Marathi news commissioner decision