कॉंक्रिटीकरणात गाडलेल्या गोदावरीची स्वच्छता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

त्र्यंबकेश्‍वर ः पावसाच्या पाण्यामुळे त्र्यंबकेश्‍वरला उद्‌भवणाऱ्या स्थितीची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा केल्यानंतर नगरपालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या दणक्‍यानंतर बुधवारी (ता. 17) पालिकेने तातडीने गाडलेल्या गोदावरीच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण केलेल्या चेंबरची साफसफाई सुरू केली. 

त्र्यंबकेश्‍वर ः पावसाच्या पाण्यामुळे त्र्यंबकेश्‍वरला उद्‌भवणाऱ्या स्थितीची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा केल्यानंतर नगरपालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या दणक्‍यानंतर बुधवारी (ता. 17) पालिकेने तातडीने गाडलेल्या गोदावरीच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण केलेल्या चेंबरची साफसफाई सुरू केली. 
त्र्यंबकेश्‍वरला उगमस्थानी गोदावरी- अहिल्या नद्यांच्या संगमापासून कॉंक्रिटीकरण करून गाडल्याने पावसाळ्यात पूरस्थिती गंभीर होऊ लागली आहे. गाडलेल्या नद्यांवर रस्ते सुरू आहेत. त्यावर पुन्हा कॉंक्रिटीकरण केल्याने उंच झालेल्या रस्त्यावरील पुराचे पाणी थेट प्रसिद्ध त्र्यंबकेश्‍वर मंदिरात आणि लोकांच्या घरांत घुसत आहे. जेमतेम पावणेदोनशे मिलिमीटर पावसाने गावात पाणीच पाणी झाले. वर्षाला दोन ते सव्वादोन हजार मिलिमीटर पाऊस होणाऱ्या त्र्यंबकेश्‍वरला अतिवृष्टी झाल्यास त्याचा फटका गावाला बसण्याची भीती आहे. मंगळवारी (ता. 16) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्र्यंबकेश्‍वरचा दौरा करून तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले. 

दणक्‍यानंतर स्वच्छता 
जिल्हाधिकाऱ्यांच्या दणक्‍यानंतर बुधवारी पालिका यंत्रणा कामाला लागली. कॉंक्रिटीकरण करून गाडलेली गोदावरी ज्या चेंबरमधून सोडली आहे, त्या गाडलेल्या नदीचा प्रवाह अडू नये म्हणून चेंबरची साफसफाई सुरू केली. त्र्यंबकेश्‍वरला पावसाचे पाणी साचण्यामागे जसे कॉंक्रिटीकरण कारणीभूत आहे, तसा नदीप्रवाह सोडलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या नाल्याची साफसफाई होत नाही, अशाही तक्रारी झाल्या होत्या. प्लॅस्टिक कचऱ्यासह कॉंक्रिट नाल्यांत घाण साचते आणि पाणी तुंबते, अशीही तक्रार होती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात कामे करताना पालिकेला नाल्या(गाडलेली नदी)चा प्रवाह मोकळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गोदावरी-अहिल्या संगमापासून तर मुख्य मंदिरापर्यंतच्या परिसरात बुधवारी जोरदार साफसफाई मोहीम राबविली गेली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news concret road