"डायलिसीस' करायचे कोठे?; रुग्णांचे हाल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मे 2020

शाहू रुग्णालयात डायलिसीस घेण्यासाठी येणारे रुग्ण सवलतीत उपचार घेतात. परंतु सेंटर बंद झाल्याने येथे येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत.

जळगाव : किडनीचे विकार असलेल्या रुग्णांना नियमित "डायलिसीस' करवून घ्यावे लागते. यात महापालिकेच्या शाहू रुग्णालयात सवलतीच्या दरात सुरू असलेले "डायलिसीस सेंटर' बंद करण्यात आल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे नाइलाजास्तव या रुग्णांना खासगी सेंटरमध्ये जाऊन इलाज करवून घ्यावा लागत असून, तेथे जास्त पैसे मोजावे लागत आहेत. 
"कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिकेचे शाहू रुग्णालय हे क्‍वारंटाइन कक्ष करण्यात आले आहे. मुळात शाहू रुग्णालय हे जळगाव पीपल्स को.-ऑप. बॅंकेने चालविण्यासाठी घेतले आहे. यात असलेले "डायलिसीस सेंटर' हे रेड स्वस्तिकने चालविण्यासाठी घेतले आहे; तर शहरात खासगी पाच "डायलिसीस सेंटर' आहेत. खासगी सेंटरच्या तुलनेत शाहू रुग्णालयातील सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांवर सवलतीच्या दरात (सहाशे रुपये) उपचार केले जातात. यामुळे रुग्णांना ते परवडते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून शाहू रुग्णालय क्‍वारंटाइन कक्ष करण्यात आल्याने येथे क्‍वारंटाइनची संख्या वाढत असल्याने येथील डायलिसीस सेंटर दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आले आहे. 

रुग्णांचे हाल 
शाहू रुग्णालयात डायलिसीस घेण्यासाठी येणारे रुग्ण सवलतीत उपचार घेतात. परंतु सेंटर बंद झाल्याने येथे येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. नाइलाजाने शहरातील खासगी सेंटरमध्ये जावे लागत असून, तेथे या रुग्णांना दुप्पटीने पैसे द्यावे लागत आहेत. यामुळे रुग्णही त्रस्त आहेत. 

कक्ष वेगळा करण्याची मागणी 
शाहू रुग्णालयाच्या खालच्या मजल्यात सेंटर चालविण्यात येत आहे. तर क्‍वारंटाइन केलेल्यांसाठी रुग्णालयाचा वरचा मजला देण्यात आला आहे. हे दोन्ही एकाच ठिकाणी असल्याने क्‍वारंटाइन केलेल्यांमध्ये "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण आढळून आल्यास त्याचा त्रास "डायलिसीससाठी' येणाऱ्या रुग्णाला होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही खबरदारी म्हणून सेंटर बंद करण्यात आल्याचे येथील सूत्रांकडून सांगण्यात आले. रुग्णांच्या सोयीसाठी सेंटर सुरू असणे गरजेचे असल्याने एक तर क्‍वारंटाइन कक्ष हलवावा किंवा सेंटरसाठी दुसरी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona jalgaon Where to do "dialysis"?

टॅग्स
टॉपिकस