esakal | दारू, गुटख्यातून होवू शकते कोरोनाची लागण...सिमावर्ती भागातून चोरटी वाहतूक
sakal

बोलून बातमी शोधा

gutkha

अतिगंभीर भमराटा नाका बाबतचे वृत्त "सकाळ'मध्ये वाचल्यानंतर तात्काळ शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी व म्हसावद पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला. पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने वरिष्ठांशी बोलून त्या नाक्‍यावर लवकरच पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. 
- डॉ. चेतन गिरासे, प्रांत अधिकारी, शहादा 

दारू, गुटख्यातून होवू शकते कोरोनाची लागण...सिमावर्ती भागातून चोरटी वाहतूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंदाणे : शहादा तालुक्‍याच्या पूर्व भागातील महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्य सीमेवरील भमराटा नाकासह अनेक चोरट्या मार्गाने मध्यप्रदेशातून दारूसह गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. पोलीस बंदोबस्त नसल्याने सर्रासपणे वाहतूक होत आहे. कोरोनाग्रस्त भागातून हा माल येत असल्याने महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांमध्ये कोरोणाची लागण होण्याची शक्‍यता वर्तवली जात असून नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. 

नक्‍की पहा -नवापूरच्या सर्व सीमा, रस्ते बंद 


मंदाणे (ता.शहादा) येथून अवघ्या 5-6 कि. मी. अंतरावर मध्यप्रदेश राज्याची सीमा आहे. या सीमेवर महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याची अनेक छोटी छोटी गावे, पाडे वसली आहेत. सीमेवरून या गांवात जाण्यासाठी अनेक लहान लहान मार्ग आहेत. या मार्गाने पुढे सरळ महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यासह धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये व गुजरात राज्यात देखील रोजच वाहतुक होत असते. ही सीमा भमराटा नाका, खेडदिगर, नवानगर, मेलन, टाकली, शहाणा, मालकातर आदी ठिकाणी महत्वाच्या नाक्‍यांशी जोडली गेली आहे. या नाक्‍यांवरून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातून छोटी-मोठी वाहने व नागरिक रोजच ये- जा करतात. सद्यस्थितीत कोरोना आजाराने संपूर्ण देशात थैमान घातल्याने सर्वच राज्यात त्याचा संसर्ग वाढत आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारकडून सर्वच राज्यांमध्ये सर्वच सीमांवर व नाक्‍यांवर संचारबंदीसह जमावबंदी लागू केली आहे. परंतु शहादा तालुक्‍यातील पूर्व भागातील महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवरील भमराटा नाक्‍यावर नाकाबंदी न केल्याने येथून व इतर चोरट्या मार्गाने मध्यप्रदेशातून सर्रास दुचाकीसह चारचाकी वाहनांचा वावर होत असतानाचे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

मध्यप्रदेशातून दारूसह गुटख्याची खुलेआम वाहतूक 
सध्या संपूर्ण देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "लॉकडाउन' करण्यात आले आहे. या लॉकडाऊनचा फायदा दारू व गुटखा विक्री करणारे घेतांना दिसत आहे. महाराष्ट्रात सरकारने आधीपासूनच गुटखा बंदी घातली आहे. मध्यप्रदेशात त्यावर कोणतीच बंदी घालण्यात आलेली नसल्याने आधीपासूनच या मार्गांनी मध्यप्रदेशातील खेतीया, पानसेमल, सेंधवा, खरगोन आदी ठिकाणांवरून महाराष्ट्रात सर्रासपणे दारू व गुटख्याची अवैध वाहतूक होत होती. याबाबत पोलीस प्रशासनास माहिती असून देखील कानाडोळा केला जात होता. परंतु सद्यस्थितीत कोरोनाने थैमान घातले असले; तरी ही वाहतूक महाराष्ट्रात काहींकडून भमराटा नाकामार्गे व इतर चोरट्यामार्गाने रोजच खुलेआम सुरू आहे. पूर्वीप्रमाणेच आजही या अतिगंभीर भमराटा नाक्‍याकडे नंदुरबार जिल्हा पोलीस खात्याचे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यासह शहादा तालुक्‍यातील सर्वच गावांमध्ये दारू व गुटख्याची सर्रास विक्री होतांना दिसून येत आहे.सध्या लॉक डाऊनमुळे तर अवैध दारू व गुटखा विक्री करणाऱ्यांना सर्वच गावात चढ्या भावाने विक्री होत असल्याने सुगीचे दिवस आले आहेत.त्यामुळे अशांचा बंदोबस्त कसा होईल यावर सर्वांचे लक्ष आहे. 

गावांमध्ये भीतीचे वातावरण 
मध्यप्रदेशातील सीमेवरील सेंधवा, खरगोन येथे कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. हा परिसर मंदाणेसह परिसरातील सीमावर्ती गावांपासून अगदी हाकेच्या अंतरावर समजला जातो. मध्यप्रदेशातील अशा कोरोनाग्रस्त भागातून दारू व गुटखा खुलेआम महाराष्ट्रात येत आहे. त्यामुळे अशा दारू व गुटखा विक्री करणाऱ्यांकडून व पिणाऱ्यांकडून कोरोना आजाराची पसरण मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे मंदाणेसह परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या अतीगंभीर प्रकार रोखण्यासाठी भमराटा नाक्‍यावर सीमाबंदी करण्याची मागणी होत आहे.