शाळा, क्‍लास सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश : पालकमंत्री गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 10 संशयित रुग्ण असून, त्यापैकी 8 जणांचे अहवाल नॉर्मल (निगेटिव्ह) आले

जळगाव : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून शाळा, महाविद्यालयांसह गर्दी होणाऱ्या ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र, तरी देखील काही ठिकाणी शाळा सुरू आहेत. अशा शाळांच्या प्रशासनावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

हेपण पहा - coronavirus : जिल्हा परिषदासह ग्रामीण शाळाही 31 पर्यंत बंद 

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 10 संशयित रुग्ण असून, त्यापैकी 8 जणांचे अहवाल नॉर्मल (निगेटिव्ह) आले असून, उर्वरित एकाचा अहवाल आज येणार असून, दुसऱ्याची तपासणी करण्यासाठी आज पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. तसेच कोरोनाबाबत ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना पत्रकाचे वाटप करून त्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात पुरेसा औषधसाठा व मास्क उपलब्ध असल्याने कुणीही घाबरून जाऊ नये. असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. 

धार्मिक कार्यक्रम टाळावे 
कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता प्रत्येकाने सामूहिक व गर्दी होणारे धार्मिक कार्यक्रमाला जाणे टाळावे. तसेच गर्दी होणाऱ्या ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याने आदेशाचे प्रत्येकाने पालन करावे. नागरिकांनी कोरोनाला घाबरून जाण्याची आवश्‍यकता नसून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. 
 
व्हेंटिलेटरसाठी 10 लाख रुपये 
जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर पुरेसे उपलब्ध नसल्याने कोरोनाचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. नागरिकांना तातडीने उपचार मिळावे, यासाठी रुग्णालयात व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी आमदार निधीतून 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले. 

स्वतंत्र वॉर्ड तयार करा 
जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी तयार करण्यात आलेला विलगीकरण वॉर्ड (आयसोलेशन) हा टीबीच्या वॉर्डमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यामुळे इतर रुग्णांना त्याचा त्रास होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. रुग्णालयात एक स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांना दिले. यावर जिल्हा रुग्णालयात 5 बेडचा स्वतंत्र कक्ष स्थापन असून अतिरिक्त रुग्णांसाठी 10 बेड राखून ठेवण्यात आले असल्याची माहिती खैरे यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona virus impact jalgaon district Guardian Minister order school class closed