"कोरोना'मुळे घरात राहून मुले होताहेत बोर...मग हे कराच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020


सांगितलेल्या गोष्टी केल्याने आपण कुटुंब म्हणून अधिक जवळ येऊ. मुलांना याची सर्वाधिक गरज आहे. पालकांनो, मुले तुमच्यावर मनापासून प्रेम करतात. त्यांना घडविण्याची, विकसित करण्याची, निरागस आनंदाची अनुभूती देण्याची ही संधी वाया घालवू नका. 
- महेश गोरडे, संचालक, कुतूहल फाउंडेशन, जळगाव 

जळगाव : शहरासह जिल्ह्यात "कोरोना'मुळे विद्यार्थ्यांच्या शाळा, महाविद्यालये, अभ्यासिका, तरण तलाव, जीम बंद आहेत. त्यामुळे त्यांच्यात जणू काही घरातच कोंडून ठेवल्याची भावना आहे. त्यावर उपाय म्हणून पालकांनी मुलांना काय आवडते याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत राहावे. त्यात नृत्य, गाणी, वेगवेगळ्या भेंड्या, कोडी यांच्या मैफिली आयोजित कराव्यात. जेणे करून विद्यार्थ्यांना घरात कंटाळवाणे वाटणार नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

हेपण पहा - भुर्रकन उडून' गेलेली चिऊ झाली दिसेनासी...!  

"कोरोना'मुळे मुले सध्या घरातच आहेत. मनोरंजनासाठी टीव्ही आहे. मात्र किती वेळ पाहणे यावरही बंधने आहेत. मुलांच्या बाहेर फिरण्यावर बंदी आहे. त्यामुळे पालकांसमोर मुलांना घरात काय शिक्षण द्यावे, कशाप्रकारे मनोरंजन करावे, असा प्रश्‍न आहे. त्यावर "सकाळ'ने मुलांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांकडून टिप्स घेतल्या, त्या अशा... 

मुलांशी आंतरिक स्नेह वाढवा 
- रोजच्या जीवनात व्यापामुळे मुलांशी धड बोलणेही नीट होत नाही. त्यात टीव्ही, मोबाईल, कार्टून, व्हॉटस्‌ऍप, फेसबूकच्या गुंत्यात * आजोबांपासून नातवांपर्यंत सर्वच अडकले. त्यातून बाहेर पडा. 
- सर्व गॅझेटस्‌ बंद ठेवून संपूर्ण कुटुंबाची गप्पांची मैफील रंगली तर कोणाला टीव्हीची आठवणच येणार नाही 
- फॅमिली फोटोंचे जुने अल्बम काढा. मुलांना आपल्या सर्व नातलगांची माहिती द्या. माहीत नसलेले अनेक नातलग मुलांना नव्याने समजतील. त्यांना पत्र लिहायला सांगा. मोबाईलवरून मुलांचे त्यांच्याशी बोलणे करून द्या. यातून मुलांना नातेसंबंधांचे महत्त्व तर कळेलच, सोबतच फेसबूकच्या आभासी मित्रांच्या युगात खरेखुरे नातेवाइक जोडले जातील. 

सर्वांनी मिळून स्वयंपाक बनवा 
पप्पा भाजी चिरताय, आई पोळ्या करतेय, दीदी भांडी घासतेय, मी ताट वाढतोय... हे सर्व अनुभवणे मुलांसाठी खूपच आनंददायी असेल. सर्व कुटुंब मिळून एकत्र काम करतेय, हा आनंद मुलांना खूप शिकवून जाईल. आईला स्वयंपाकासाठी रोज किती कष्ट घ्यावे लागतात, याचीही त्यांना जाणीव होईल. 

काही टिप्स 
- पाल्यांना गोष्टी भरपूर सांगा. 
- भरपूर खेळू द्या. 
- त्यांच्या आवडीच्या ऍक्‍टिव्हिटीज करवून घ्या. 
- जवळच्या सर्व नातेवाइकांना पत्र लिहायला प्रोत्साहन द्या. 
- त्यांची कल्पनाशक्ती वाढवा. 
- आजूबाजूच्या लोकांबद्दल मुलांना माहिती करून द्या. 
- आपले गाव कसे आहे, हे समजून सांगण्यासाठी मुलांना घेऊन रोज एक गल्लीबोळ फिरून या. 
- अंगणात/गच्चीवर झोपून चंद्र, चांदण्या, तारे यांची मजा घेऊ द्या. 
- आकाशाचे रंग कळू द्या. 
- सतत मुलांना काय आवडते, याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत राहा. 
- नृत्य, गाणी, वेगवेगळ्या भेंड्या, कोडी यांच्या मैफिली जमू द्या. 
- सापशिडी, ज्यूदो, बुद्धिबळ, कॅरम, राजा-राणी, चोर-शिपाई यासारखे खेळ खेळा. यातून सर्वांमध्ये संवाद होईल. 
- पुस्तक वाचा, इतरांना ऐकवा. 
- कथा, कविता करा. 
- जुन्या वृत्तपत्रांतील कात्रणे काढा, शब्दकोडी सोडवा, चित्रांमध्ये रंग भरा. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona virus school vacetions child house game