पडताळणीत अडकली बोंडअळीची भरपाई 

पडताळणीत अडकली बोंडअळीची भरपाई 

जळगावः जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने कपाशीचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई देण्याचे जाहीर केले, पण तीन महिने उलटूनही जिल्ह्याला बोंडअळीची मदत मिळालेली नाही. जिल्हा समितीकडून पडताळणीतच अद्याप ही मदत अडकली आहे. आलेल्या पावणेपाच लाखांवर अर्जांपैकी दहा टक्के अर्जांचीही पडताळणी अद्याप झालेली नाही. बोंडअळीची मदत या पडताळणीतच अडकून पडली आहे. त्यावर गलथान कारभाराचा कळस म्हणजे केवळ 17 शेतकऱ्यांना मदतीचे प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे पाठवून सर्व बोंडअळीग्रस्तांची प्रशासनाने अक्षरशः थट्टा चालविली आहे. 

पाकिटांची सक्ती नाही, तरीही
जिल्ह्यात बोंडअळीमुळे तीन लाख 80 हजार हेक्‍टरवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बोंडअळीने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने जानेवारी महिन्यात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी भरपाई देण्याची घोषणा केली. मात्र, पंचनामे करताना शेतकऱ्यांनी कोणत्या कंपनीचे बियाणे विकत घेतले, त्याचे खाली पाकिट, बियाण्यांचे बिल, 7/12 उताऱ्यावर नोंद या बाबी पाहिल्या गेल्या. शेतकऱ्यांनी याबाबत लोकप्रतिनिधींकडे तक्रार केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. नंतर शासनाने बियाण्यांच्या रॅपरची सक्ती मागे घेतल्याचे जाहीर केले होते. तरीही याच गुंतागुंतीत पंचनामे गुरफटले आहेत. 

पडताळणीची कासवगती 
शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून "जी' फार्म भरून घेतला. त्यानंतर तपासणी पथकाकडून "एच'फार्म भरला गेला. मात्र जिल्हास्तरीय समितीच्या कासवगतीमुळे पावणेपाच लाख अर्जांपैकी आतापर्यंत केवळ 11 हजार 894 अर्जांची पडताळणी झाली. या समितीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी, तज्ञ कृषी अधिकारी आहेत. अजून पडताळणीची प्रक्रिया बाकी असताना अवघे 17 शेतकऱ्यांचे भरपाईचे दावे पुणे कृषी आयुक्तालयाकडे पाठवले गेले. त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश कृषी आयुक्त कार्यालयाने संबंधित बियाणे कंपन्यांना दिले. मात्र, तीही अद्यापपर्यंत कोणाला मिळाली नाही. 

मदत मिळेल केव्हा? 
इतर शेतकऱ्यांच्या अर्जांची तपासणी जिल्हास्तरीय पाहणी केव्हा करेल. त्यांच्या कृषी आयुक्तालयाकडे सुनावणी केव्हा होईल व भरपाई केव्हा होईल, या विवंचनेत शेतकरी अडकलाय. एका महिन्यावर खरीप हंगाम आला असल्याने शेतकऱ्यांना जर ही मदत मिळाली तर बियाणे, खते घेण्यास मदतीचा आधार होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 
जिल्ह्याची स्थिती 
कापसाचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) ः 4,75,947 
नुकसानग्रस्तांचे अर्ज ः 4,87,497 
पाहणी अर्ज (आय फार्म) ः 11,894 

 

जिल्ह्यातील 90 टक्के शेतकऱ्यांचे बोंडअळीमुळे नुकसान झाले आहे. असंख्य शेतकऱ्यांनी नुकसानीबाबतचे जी फार्म भरून दिले आहेत, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना बोंडअळीच्या नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकरी सावरण्यासाठी शासनाने भरपाई त्वरित देण्याची गरज आहे. 
एस. बी. पाटील, 
सदस्य, शेतकरी सुकाणू समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com