जिनिंग उद्योगांना 800 कोटींचा फटका 

देविदास वाणी
बुधवार, 21 मार्च 2018

जळगाव - खानदेशातील कपसाचा दर्जा देशात सर्वोत्तम मानला जातो. यामुळे खानदेशातून दरवर्षी हजारो गाठी परदेशात निर्यात होतात. यंदा गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे सुमारे चार लाख गाठीची घट झाली आहे. यामुळे 800 कोटींचे नुकसान खानदेशातील जिनिंग उद्योगांना सहन करावे लागत आहे. 

जळगाव - खानदेशातील कपसाचा दर्जा देशात सर्वोत्तम मानला जातो. यामुळे खानदेशातून दरवर्षी हजारो गाठी परदेशात निर्यात होतात. यंदा गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे सुमारे चार लाख गाठीची घट झाली आहे. यामुळे 800 कोटींचे नुकसान खानदेशातील जिनिंग उद्योगांना सहन करावे लागत आहे. 

बोंडअळीने केला घात 
जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र वाढत असताना यंदा बोंडअळीने घात केल्याने निम्म्यावर उत्पादनात घट झाली. साडेतीन लाख हेक्‍टरवरील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवाळीनंतर झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पहिला हंगाम चांगला आला. काही शेतकऱ्यांनी तो कापूस परराज्यातील व्यापाऱ्यांना विकला. काहींनी जिल्ह्यात तर काहींनी कापूस खरेदी केंद्रावर विकला. परराज्यातील व्यापाऱ्यांकडून अधिकचा दर कापसाला मिळतो. चांगला भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकरी परराज्यातील व्यापाऱ्यांना कापूस विकतात. याचाही फटका जिनिंग व्यावसायिकांना बसला आहे. 

निर्यातीस अयोग्य माल 
कपाशीवर बोंडअळी पडल्याने कापसाचा दर्जा घसरला. गाठीचा दर्जा चांगला नसल्याने परदेशात जाण्यास अयोग्य झाल्या. यामुळे अनेक जिनिंग प्रेसिंग व्यापाऱ्यांना तयार झालेल्या गाठी जिल्ह्यासह इतर राज्यात असलेल्या टेक्‍स्टाईल कंपन्यांना कमी भावात विकावा लागला. यामुळे जिनिंग चालकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले. 

गुलाबी बोंड अळीमुळे जिनिंग उद्योगांना मोठा तोटा आला आहे. दीडशे जिनिंग प्रेसिंग मिल खानदेशात आहेत. कपाशी अभावी 70 मिल्स एकाच शिफ्टमध्ये सुरू होत्या. परदेशात हजारो गाठी दरवर्षी जात असे. मात्र बोंडअळीमुळे दोन हजार गाठीही परदेशात गेलेल्या नाहीत. 
-प्रदीप जैन, अध्यक्ष,  खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल असोसिएशन. 

यंदा कपाशीला अधिक भाव मिळेल या आशेने अद्यापही तीस टक्के कापूस शेतकऱ्यांकडे आहे. यंदाचा हंगाम म्हणावा तसा फायदेशीर झाला नाही. बोंडअळीमुळे कपाशीचा दर्जा चांगला नसल्याने परदेशात कपाशीच्या गाठी निर्यात झाल्या नाहीत. 
-संदीप पाटील, संचालक  लक्ष्मी जिनिंग मिल आव्हाणे. 

बोंडअळी नियंत्रणासाठी उपाय 
जिनिंग प्रेसिंग असोसिएशन, राशी सिड्‌सतर्फे बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील 58 जिनिंग कारखान्यामध्ये 2 हजार 202 कामगंध सापळे लावले आहेत. यासह विविध प्रकारच्या उपाय योजना केल्या. आगामी हंगाम बोंडअळी न येण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चित्रफीत, बॅनरद्वारे, मेळावे घेऊन जनजागृती केली आहे. 

आकडे बोलतात.... 
कपाशीची लागवड क्षेत्र -4 लाख 60 हजार(हेक्‍टर) 
बोंडअळीचा प्रादुर्भाव क्षेत्र--3 लाख 60 हजार 
दरवर्षी गाठींची निर्मिती 18 लाख 
यंदा आतापर्यंत निर्मिती 14 लाख 

Web Title: marathi news cotton jalgaon news Jining Industry