"डब्बा ट्रेडिंग'मधून दररोज कोटीची उलाढाल 

"डब्बा ट्रेडिंग'मधून दररोज कोटीची उलाढाल 

जळगाव : समांतर शेअर बाजार चालवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या "डब्बा ट्रेडिंग' सेंटरवर मंगळवारी कारवाई झाल्यानंतर या व्यवहारात दररोज कोटीची उलाढाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे ही कारवाई म्हणजे हिमनगाचे टोक आहे. यात बडे "बुकी' अद्याप मोकाट असून त्यात काही पोलिसांची भागीदारी असल्याचे बोलले जात आहे. 
जळगाव शहरात मंगळवारी पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या नेतृत्वातील पथकाने "डब्बा ट्रेडिंग'च्या नावाखाली चालणाऱ्या समांतर शेअर बाजाराच्या दोन केंद्रांवर छापा टाकत संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले आहे. मात्र, ही कारवाई म्हणजे या अवैध व्यवसायातील हिमनगाचे एक टोक आहे. या व्यवहारांमध्ये गुंतलेले अनेक संशयित तसेच मुख्य "बुकी' अद्याप मोकाट आहेत. 

दररोज कोटीची उलाढाल 
जळगावातील दोन केंद्रांवर ही कारवाई झाली असली तरी काही केंद्र अद्याप सुरुच आहेत. त्या माध्यमातून दररोज किमान 50 लाख ते कोटीची उलाढाल होत आहे. जळगावातील दोन मुख्य "बुकी' गेल्या वीस वर्षांपासून हा "धंदा' चालवीत असून त्यात काही पोलिसांची भागीदारी असल्याचीही माहिती समोर येत आहे. केवळ जळगाव शहरापुरते नव्हे तर राज्यात व देशभरात अशाप्रकारच्या "डब्बा ट्रेडिंग'चे नेटवर्क सक्रिय आहे. मुंबई, नागपूरसह यवतमाळ येथेही या अवैध व्यवहारांचे सेंटर असल्याची माहिती समोर येत आहे. 
 
असे चालते "डब्बा ट्रेडिंग' 
विविध कंपन्यांचे शेअर खरेदी-विक्रीचा अधिकृत व्यवहार बॉम्बे स्टॉक एक्‍स्चेंज व "निफ्टी'च्या माध्यमातून चालतो. दररोज अब्जावधींचे व्यवहार या बाजारातून अधिकृतपणे होत असतात. त्यातून कंपन्यांसह खरेदी- विक्री करणाऱ्यांना नफा- नुकसान होते. मात्र, त्यातून भारत सरकारला मोठ्या प्रमाणावर कर मिळतो. "डब्बा ट्रेडिंग' हा प्रकार शेअरचीच खरेदी- विक्री करणारा आहे, मात्र ती एक्‍स्चेंजच्या माध्यमातून न होता बेकायदेशीरपणे दलालांच्या (सटोडे) माध्यमातून होते. त्यातून भारत सरकारचा करही बुडविला जातो, शिवाय अनेकांची मोठी फसवणूकही होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com