तर मत मागायला येणार नाही : आमदार गुलाबराव पाटील

तर मत मागायला येणार नाही : आमदार गुलाबराव पाटील

धरणगाव : मंत्री पदाच्या कार्यकाळात शहराचा विकासासाठी दिलेल्या निधीमुळे शहरवासीयांनी मला भरभरून मते दिली. यापुढेही मंत्रीपद मिळण्याची चिन्हे असून शहरातील अंतर्गत पाईपलाईन, अंतर्गत रस्ते व भूमीगत गटारीसाठी ९० कोटीचा प्रस्ताव प्रलंबित असून तो मंजूर करुन भविष्यात शहराला दोन दिवसाआड पाणी देण्याचा माझा प्रयत्न आहे. शहराला पुढील पंचवार्षिक निवडणुकीपर्यंत दोन दिवसाआड पाणी न झाल्यास मी आपणाकडे मते मागायला येणार नाही, असा वादा आमदार गुलाबराव पाटील यांनी येथे झालेल्या प्रचारसभेत केले. काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील अध्यक्षस्थानी होते. 


दुर्देवाने विद्यमान नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या अकाली निधनामुळे आपण सर्वांना नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणूकीला सामोरे जावे लागत असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. शिवसेनेचा मी आमदार आहे. म्हणुन नगराध्यक्षही शिवसेनेचाच निवडून आल्यास शहर विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी दिला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमूख गुलाबराव वाघ, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधारी, शिवसेना उपजिल्हाप्रमूख पी. एम. पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, लिलाबाई चौधरी, उमेदवार नीलेश चौधरी यांनी शिवसेनेच्या माध्यमातून केलेली जनसेवा, झालेली विकास कामे याचा ओहापोह करुन शिवसेनेला साथ देण्याचे सांगितले. सभेला शहरवासीयांनी प्रचंड गर्दी केली होती. 

माता- पिता अन् उमेदवार पुत्राचे भाषण 
सभेत शिवसेना उमेदवार नीलेश चौधरी, त्याचे पिता माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी व त्याची माता गृहिणी निलाबाई चौधरी या तिघांनी भावनिक भाषण करुन मतदारांना आवाहन केले. या तिघांमध्ये गृहीणी असलेली निलेशची आई निलाबाई यांचे भाषणाने मतदार भारावून गेले. त्‍यांच्‍या भाषणाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले. 

काँग्रेसमुळे गुलाबरावांना पुन्हा मंत्रीपद 
यावेळी भाजपशी सेनेची फारकत झाल्यानंतर काँग्रेसने सेनेला साथ दिली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे गुलाबराव पुन्हा मंत्री होतील, असे मत काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी व्यक्त केले. तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com