पैशांसाठी दलालांनी लावले तरुणीचे दोन विवाह 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

धरणगाव ः नागपूरच्या दलालांनी पैशांसाठी एकाच तरुणीचे तालुक्यातील दोन तरूणांशी विवाह लावून फसवणूक केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २७) उघडकीस आली आहे. फसवणूक करणारे हे मोठे रॅकेट असून, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आज तरुणीसह संशयित दलांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

धरणगाव ः नागपूरच्या दलालांनी पैशांसाठी एकाच तरुणीचे तालुक्यातील दोन तरूणांशी विवाह लावून फसवणूक केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २७) उघडकीस आली आहे. फसवणूक करणारे हे मोठे रॅकेट असून, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आज तरुणीसह संशयित दलांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

बोरगाव (ता. धरणगाव) येथील सुरेश यादव पाटील यांचा पूत्र रवींद्र पाटील याच्याशी आचल हिचा बोरगावच्या विठ्ठल मंदिरात विवाह झाला. सुशिक्षित व उच्चशिक्षित असलेल्या आचलचे खेडेगावात चित्त लागत नसल्याचे तिने त्यांना सांगितले. राजू भोपचे, निशांत पटवे, अंकुश पटवे यांनी मला येथे आणून माझा विवाह लावून दिला. मला बोरगावला काही एक त्रास झालेला नाही. मात्र, मला येथे राहायची इच्छा नसल्याने मी जाणार असल्याचे तीचे म्हणणे आहे. दलालांनी वर पक्षाकडून घेतलेले पैसे मी नागपूर गेल्यावर पाठवून देईन असेही तीने सांगितले. काल रात्री आचल नागपूर जाण्यासाठी एरंडोल येथे आली होती. मात्र, ग्रामस्थांनी तिला समजावून परत बोरगावला नेले. धरणगाव पोलिसांना घटनेची माहिती देऊन तीला नागपूर पाठवून असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. याअनुषंगाने आज सकाळी साडेअकराला तिला पोलिसांसमोर हजर करण्यात आल्यानंतर तीने सर्व कहाणी कथन केली. 

मोठ्या रॅकेटची शक्यता 
आचलने सुमारे वीस दिवसापूर्वी धरणगाव येथील सचिन सुभाष वाघ या मुलाशीही विवाह केला होता. विवाहानंतर अर्ध्या तासातच ती पळून गेल्याचे वाघ कुटुंबीय पोलिस ठाण्यात सांगत होते. या कुटुंबाला देखील आर्थिक झळ पोहचली असून, तालुक्यासह खानदेशात अशा अनेक मुली आणल्या गेल्याची चर्चा आहे. नागपूर येथे अशा फसवणुकीचे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सोबत येणारे दलाल पैशांसाठी तरुणींचा विवाह लावून देतात आणि तेच मुलीला पळवून नेतात अशी माहिती उजेडात आली आहे. या प्रकरणातील तरुणी आचल ही नागपूर येथील असून सीआरपीएफ गेट नागपूर येथे राहत असल्याचे सांगत आहे. आचल उर्फ माया देशमुख असे ती नाव सांगत असून तीचे वय वीस वर्ष आहे. 

तरुणीची पोलिसांपुढे आपबिती 
राजू भोपचे, निशांत पटवे, अंकुश पटवे यांनी या दोन्ही विवाहसाठी पैसे देण्याच्या बोलीवर मला आणले होते. मात्र, मला पैसे मिळाले नाहीत. माझ्या कुटुंबाला पैशांची गरज असल्याने मी या प्रकरणात अटकली. भविष्यात असे करणार नाही, अशी विनवणी त्या तरुणीने पोलिसांना केली. या टोळीचा महोरक्या ललित पटवे आहे, असेही या तरुणीने सांगितले. बोरगाव ग्रामस्थांनी गावातील तरुणाची फसवणूक झालेली असतानाही तरुणीने सुरक्षित परत जावे यासाठी तिला समजावून पोलिस ठाण्यात हजर केले. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या जनाबाई पाटील, उपसरपंच मुन्ना पाटील, गोविंद पाटील, नसीर पठाण, नंदू पाटील, स्वप्निल पाटील, डॉ. अतुल सोनवणे आदींनी मध्यस्थी केली. याप्रकरणी रवींद्रने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणी व दलालांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक पंकज देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dharangaon vivah froad