आणखी एक धर्मा पाटील न्यायाच्या प्रतीक्षेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

बिजोरसे : मंत्रालयात आत्महत्या करणारे धर्मा पाटील प्रकरण देशभर गजले असताना आता बागलाण तालुक्‍यातील खालचे टेंभे येथील धर्मा पाटील यांनासुद्धा न्याय देण्यात महसूल खाते अपयशी ठरले आहे. 

बिजोरसे : मंत्रालयात आत्महत्या करणारे धर्मा पाटील प्रकरण देशभर गजले असताना आता बागलाण तालुक्‍यातील खालचे टेंभे येथील धर्मा पाटील यांनासुद्धा न्याय देण्यात महसूल खाते अपयशी ठरले आहे. 

धर्मा गणपत पाटील मूळचे खालचे टेंभे येथील शेतकरी. लहान वयातच पितृछत्र हरपले. त्यांच्या वडिलांच्या नावावर गावात गट क्रमांक 28 ला नऊ एकर 18 गुंठा जमीन होती. धर्मा पाटील सज्ञान नसल्यामुळे त्यांच्या जमिनीवर त्यांचे नाव "अपाक' म्हणून लागले. लहानपणापासून ते या जमिनीवर खरीप रब्बी हंगामातील पिके काढत होते. मात्र त्यांच्या चुलत्यांनी त्यांचा लहानपणाचा गैरफायदा घेऊन महसूल विभागाच्या मेहरबानीने बेकायदेशीरपणे ही जमीन गावातीलच बीरा गोवेकर व लहानू पारसे यांना विकली.

जेव्हा पाटील यांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले तेव्हा तलाठ्याकडे "अपाक' नाव कमी करून सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव लावण्यास गेले असता ही जमीन विक्री होऊन नोंद बदलल्याचे सांगण्यात आले. याबाबत न्याय मिळविण्यासाठी धर्मा पाटील यांनी सटाणा तहसील कार्यालय, कळवण प्रांत कार्यालय, मालेगाव अपर जिल्हा अधिकारी कार्यालय, नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. 

तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांच्यासमोर त्यांनी कैफियत मांडली. यावर राणे यांनी स्वतःच्या सहीचे पत्र देऊन नाशिक जिल्हाधिकारी व बागलाणच्या तहसीलदारांना तत्काळ कार्यवाही करण्याचा आदेश दिला. मात्र महसूल खात्याने त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत अद्याप काहीच कार्यवाही केली नाही. धर्मा पाटील आज 80 वयाचे झाले असून, त्यांचा न्यायदेवतेवरील विश्‍वास उडाला आहे. 
.. 
महसूल कायद्यानुसार "अपाक' जमिनीची खरेदी-विक्री करता येत नाही. धर्मा पाटील यांची बाजू रास्त असून, महसूल खात्याने तत्काळ कार्यवाही केली नाही तर प्रकार गंभीर होऊ शकतो. मी त्यांच्या पाठीशी आहे. 
-दीपिका चव्हाण, आमदार, बागलाण 

मी आजपर्यंत शेकडो वेळा महसुली कोर्टात न्याय मिळविण्यासाठी चकरा मारल्या आहेत. मात्र न्याय मिळू शकला नाही. वय झाल्याने आता घरी मरण्यापेक्षा शासनाच्या दारात मेलेले बरे. 
-धर्मा पाटील 
 

Web Title: marathi news dharma patil proposal