कचरा ठेकेदाराची उलटी बोंबा; मोठा तोटा, आम्हालाच स्वारस्य नाही 

रमाकांत घोडराज
Saturday, 12 December 2020

कोरोनाच्या भीतीमुळे कामगार कामावर येण्यास नकार देतात अथवा चालढकल करतात. निविदा काढतेवेळी महापालिकेने जास्तीत जास्त १६८ टन कचरा निर्माण होतो.

धुळे ः शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचे काम ३१ डिसेंबरअखेर थांबविण्याचा आदेश स्थायी समिती सभापतींनी दिल्यानंतर वॉटरग्रेसचा विषय आता संपल्यात जमा आहे. मात्र, कचरा संकलनाचे काम सुरू केल्यापासून संस्थेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे संस्थेलाच आता हे काम करण्यास स्वारस्य नाही, असे वॉटरग्रेस संस्थेने म्हटले आहे. 

आवश्य वाचा- वेळेची शिस्त.. प्रोटोकॉलचा सन्मान अन्‌ पवार ! 

शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस संस्थेने महापालिकेला दिलेल्या खुलाशात मुळात संस्थेला हा ठेकाच परवडत नसल्याचे म्हणत महापालिकेवरच विविध आक्षेप नोंदविले आहेत. ते किती खरे, किती खोटे, हे महापालिका यंत्रणा व ठेकेदारालाच माहीत. 

मोठा आर्थिक तोटा 
कंपनीस कामाचा आदेश मिळाल्यापासून ते आजपर्यंत खर्च व उत्पन्नाचा अंदाज घेतला, तर मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा संस्थेस भविष्यातही सहन करावा लागणार आहे. इंधन दरवाढ, महागाई निर्देशांकातील वाढ, अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाहनांचे कचरा संकलन व वाहतूक करण्याची क्षमता विचारात घेता भविष्यात संस्थेस काम करणे खूप अडचणीचे होणार आहे. या आर्थिक अडचणींचा विचार करता संस्थेला काम करण्यास स्वारस्य राहिले नसून, करारनाम्यातील अनुषंगिक अटीनुसार निविदा रद्द करून नियमानुसार तसेच कार्यादेश देतेवेळी जमा केलेली सुरक्षा अनामत, नियमित बिलातून कपात केलेली सुरक्षा अनामत परत करावी. दरमहाच्या बिलातून कपात केलेली व आम्हास लागू नसलेली जीएसटी, शासकीय विमा, लेबर चार्जेस, सर चार्जेस आदी कपात केली आहे. ही रक्कम आम्हाला परत मिळावी, असे वॉटरग्रेसने म्हटले आहे. 

अशा अडचणी, अशा चुका 
महापालिकेने खरेदी घंटागाड्यांची कचरा वाहतुकीची क्षमता कमी आहे. धुळे शहराचा विस्तार पाहता इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर येत आहे. घंटागाड्यांवरील चालक, मजूर स्थानिक आहेत. त्यांच्यात अंतर्गत वादामुळे संस्थेस काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे कामगार कामावर येण्यास नकार देतात अथवा चालढकल करतात. निविदा काढतेवेळी महापालिकेने जास्तीत जास्त १६८ टन कचरा निर्माण होतो, असे गृहीत धरून निविदा काढली होती. प्रत्यक्षात २००-२५० टन दैनंदिन कचरा संकलन केला जातो. १६८ टनापेक्षा जास्त कचरा संकलनास स्वच्छता निरीक्षकांकडून मज्जाव होतो. त्यामुळेही शहरात कचरा पडून राहतो. करारनाम्यानुसार आवश्यक सुविधा महापालिकेकडून प्राप्त होण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत असल्याचे वॉटरग्रेसने म्हटले आहे. 

वाचा- नंदुरबार वैद्यकिय महाविद्यालयात पद निर्मितीस मान्यता

स्वखर्चाने वाहने लावली 
महापालिकेच्या वाहनांमार्फत (घंटागाड्या) संपूर्ण शहरासाठी सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे संस्था स्वखर्चाने जवळपास ४०-४५ वाहने लावून कचरा संकलित करीत आहे. या वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड संस्था स्वतः सोसत आहे. त्यामुळे संस्थेवर अतिरिक्त आर्थिक जबाबदारी पडत असल्याचेही ‘वॉटरग्रेस’ने खुलाशात नमूद केले आहे, हे विशेष. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhue municipal and waste monopoly disputes