धुळ्याच्या शिवराणा ग्रुपतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 55 हजारांचे योगदान 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

राज्यावरील "कोरोना'च्या संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन केले. त्यास शिवराणा ग्रुप धुळेने प्रतिसाद दिला. 

धुळे ः संसर्गजन्य "कोरोना' महामारीमुळे केंद्र व राज्य सरकार चिंतेत आहे. सर्व पातळीवर या महामारीशी मुकाबला केला जात आहे. यात खारीचा वाटा म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्ह्यात सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या शिवराणा ग्रुपने पुढाकार घेतला. ग्रुपच्या सदस्य तरुणांनी बांधिलकी जपत 55 हजाराचा निधी संकलित करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रदान केला. 

सामाजिक जाणिवेतून धुळे जिल्ह्यातील शिवराणा ग्रुपने निधी संकलनाचे कार्य उभारले. त्यात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 55 हजार 555 रुपयांचे योगदान दिले. सोशल मीडियाबाबत वेगवेगळे मतप्रवाह असताना तरुणांच्या शिवराणा ग्रुपने आदर्शवत कार्य समाजासमोर ठेवले. राज्यावरील "कोरोना'च्या संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन केले. त्यास शिवराणा ग्रुप धुळेने प्रतिसाद दिला. 

148 तरुणांचे योगदान 
विशिष्ट कालमर्यादेत 148 तरुण सदस्यांनी मदत निधी संकलित केला. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी बांधिलकी जोपासणाऱ्या शिवराणा ग्रुपच्या कार्याची प्रशंसा केली. सक्रिय तरुणांचे कौतुक केले. तरुणांनी विधायक पद्धतीने समाजकार्यात योगदान द्यावे, सोशल मीडियावर उदात्त कार्य उभारता येऊ शकते, असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. शिवराणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तेजपालसिंह भरतसिंह गिरासे यांनी आभार व्यक्‍त केले. ग्रुपच्या माध्यमातून यापुढेही समाजहितासाठी सक्रिय राहू, अशी ग्वाही श्री. गिरासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule 55 thousand contribution to CM Assistance Fund by Shivrana Group