जाती प्रमाणपत्राला जादा शुल्क आकारल्यास केंद्रच रद्द 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

आपले सरकार सेवा केंद्रचालकांनी विविध प्रमाणपत्र, शासकीय सेवांबाबत शासन नियमाप्रमाणे निश्चित केलेले दर (दरफलक), शासकीय सेवांची यादी, सेवा देण्याचा कालावधी आदी माहिती नागरिकांना दिसेल, अशा दर्शनी भागावर लावावी.

धुळे : आपले सरकार सेवा केंद्रातून प्रतिज्ञापत्रासह जातीच्या प्रमाणपत्रासाठी ५७ रुपये २० पैसे शुल्क असून, उर्वरित सर्व शासकीय सेवांचे (प्रमाणपत्र) शुल्क ३३ रुपये ६० पैसे आहे. यापेक्षा जास्त आकारणी होत असल्यास नागरिकांनी संबंधित आपले सरकार सेवा केंद्रचालकाविरुद्ध तहसीलदारांकडे तक्रार करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा ‘आधार’चे नोडल अधिकारी प्रमोद भामरे यांनी केले आहे. जादा शुल्क आकारणी होत असल्यास प्रसंगी संबंधित केंद्र रद्द करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 
आपले सरकार सेवा केंद्रचालकांनी विविध प्रमाणपत्र, शासकीय सेवांबाबत शासन नियमाप्रमाणे निश्चित केलेले दर (दरफलक), शासकीय सेवांची यादी, सेवा देण्याचा कालावधी आदी माहिती नागरिकांना दिसेल, अशा दर्शनी भागावर लावावी. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराची आकारणी करणाऱ्या तसेच शासन नियमांचे पालन न करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांविरुद्ध शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल. 

आधारकार्डचे दर असे 
नवीन आधार नोंदणीसह बाल आधार पाच वर्षांनंतर अद्ययावत करणे (अनिवार्य), हाताचे ठसे, डोळ्यांच्या बुबुळांचे बायोमेट्रिक अपडेशन करणे निःशुल्क आहे. सर्वसामान्य नागरिकांचे आधार डेमोग्राफिक/ बायोमेट्रिक अपडेट करणे, नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासह हाताचे ठसे, डोळ्यांच्या बुबुळांचे बायोमेट्रिक अपडेशन करण्यासाठी १०० रुपये. सर्वसामान्य नागरिकांचे नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांकासह डेमोग्राफिक अपडेशन करण्यासाठी ५० रुपये. ई-आधार डाउनलोड करून कलर प्रिंट देण्यासाठी ३० रुपये शुल्क निर्धारित केले आहे. आधार अपडेशनसाठी जास्त रकमेची आकारणी होत असेल, तर संबंधित केंद्र चालकाविरुद्ध संबंधित तहसीलदार किंवा शहरी भागात महापालिका आयुक्त किंवा मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. 
 
घरबसल्या अपडेशन 
https://ssup.uidai.gov.in/ssup या संकेतस्थळावर घरबसल्या आधारमधील नाव, पत्ता, जन्मतारीख आणि भाषा स्वतः Aadhaar Self Service Update Portal द्वारे विनामूल्य अद्ययावत करण्याची सुविधाही आहे. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक (Link) असणे आवश्यक असल्याचेही श्री. भामरे यांनी म्हटले आहे. 
 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule aadhar and cast certificate rate fix