चढ्या दराने मद्य विक्री भोवली...51 वाइन्स शॉपच्या मद्यसाठ्यात मोठी तफावत ! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

शहरासह जिल्ह्यात "लॉकडाउन' कालावधीत मद्यविक्रेत्यांनी चढ्या दराने मद्याची विक्री केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे तळिरामांनी केली होती.

धुळे:  "कोरोना'चा पार्श्‍वभूमीवर जिल्हा लॉकडाउन असतानाही काही वाइन्स शॉपचालकांनी मद्याची चढ्या दराने विक्री केली. याबाबत एका तक्रारीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागामधील एकूण 51 वाइन्स शॉपच्या मद्यसाठ्यात मोठी तफावत आढळल्याने धुळे शहरातील मद्याची दुकाने खुली होऊ शकले नाहीत. परिणामी तळीरामांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 

"कोरोना'चा पादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन लागू केले होते. यातच लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात शासनाने शिथिलता दिल्याने "रेड झोन'वगळता अन्य झोनमध्ये मद्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती. शहरासह जिल्ह्यात "लॉकडाउन' कालावधीत मद्यविक्रेत्यांनी चढ्या दराने मद्याची विक्री केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे तळिरामांनी केली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीनुसार 30 एप्रिलला राज्य उत्पादन शुल्क विभागाला पालिका व महापालिका क्षेत्रातील अधिकृत वाइन्स शॉपमधील "लॉकडाउन'पूर्वीचा असलेला मद्यसाठा तपासणीचे आदेश निर्गमित केले होते. त्यानंतर सुमारे महिन्याभरानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील 23 व ग्रामीण भागातील 27 अशा 51 वाइन्स शॉपचा मद्यसाठ्याची तपासणी केली. तपासणीनंतर मोठ्या प्रमाणात मद्यसाठ्यात तफावत आढळून आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा 51 वाइन्स शॉपचालकांना कारणे दाखवा नोटीसतंर्गत कारवाई केली. येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे शॉपचालकांचा कारणे दाखवा नोटीसअंतर्गत अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Alcohol sales at an ascending rate and big difference in the wines of 51 wine shops