संचारबंदीचे उल्लंघन : बॅंक शाखाधिकाऱ्यासह किराणा दुकानावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

तीन- चार दिवसांपासून बॅंक बंद होती, आजच उघडल्याचे सांगितले. याप्रकरणी संचारबंदी आदेशाचे तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याने बॅंक शाखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

चिमठाणे : "कोरोना'मुळे येथे एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने चिमठाणे ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत दलवाडे व पिंप्री (ता. शिंदखेडा) येथे "कंटेन्मेंट झोन' जाहीर करण्यात आला आहे. असे असताना गेल्या शुक्रवारी (ता. 15) येथील बॅंक ऑफ इंडियाची शाखा सुरू ठेवली. तसेच एका किराणा दुकानदारानेही दुकान सुरू करत संचारबंदीचे उल्लंघन केले. त्यामुळे बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यासह दुकानदाराविरुद्ध शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

क्‍लिक करा - आकाशवाणीचे धुळे केंद्र... आता ऐकणार आहे मराठी विषयाच्या अभ्यासक्रमा संदर्भात... 

येथील महिलेचा गेल्या 11 मेस रात्री साडेअकराला कोरोनामुळे मृत्यू झाल्याने येथे व दलवाडे व पिंप्री गाव 20 मेपर्यंत "कंटेन्मेंट' झोन जाहीर आहे. संचारबंदीही लागू असताना गेल्या शुक्रवारी (ता. 15) दुपारी बाराच्या सुमारास तहसीलदार साहेबराव सोनवणे, शिंदखेड्याचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, येथील दूरक्षेत्राचे सहाय्यक निरीक्षक मनोज ठाकरे, हवालदार माळी, कर्मचारी राजेंद्र पावरा, मरद यांना बॅंक ऑफ इंडियाच्या येथील शाखेसमोरील रस्त्यावर ग्रामस्थांची गर्दी दिसली. चौकशी केली असता बॅंक सुरू असल्याचे आढळले. याबाबत शाखाधिकारी अमोल रमेश पाटील (वय 36, रा. वृंदावन कॉलनी, देवपूर, धुळे) यांना याबाबत विचारणा केली असता, तीन- चार दिवसांपासून बॅंक बंद होती, आजच उघडल्याचे सांगितले. याप्रकरणी संचारबंदी आदेशाचे तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याने बॅंक शाखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान, याच दिवशी दुपारी साडेबाराला शेवाडे रस्त्यावरील दत्त किराणा दुकानही सुरू ठेवल्याने दुकानदार ज्ञानेश्वर लोटन बागड (वय 47, रा. सीमा हाउसिंग सोसायटी, गणपती मंदिराजवळ, शिंदखेडा) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला. सहाय्यक निरीक्षक मनोज ठाकरे तपास करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule bank officer and shop fir Violation of curfew