विसर्जनावेळी पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

Marathi News Dhule breaking news child drowned while immersion procession
Marathi News Dhule breaking news child drowned while immersion procession

सोनगीर (धुळे) : नंदाणे (ता. धुळे) येथे गावनदीच्या बंधाऱ्यात गणेश विसर्जन करतांना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षे वयाच्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. चेतन नितीन पाटील असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

चेतनच्या अकस्मात मृत्यूने गावात शोककळा पसरली. गावातील सर्व गणेश विसर्जन मिरवणूकीच्या उत्साहावर विरजण पडले. वाजंत्री बंद करण्यात येऊन शांततेत परंपरा न मोडता अवघ्या दहा मिनिटात जवळच्या पाझर तलावात गणपती विसर्जन करण्यात आले. 
नंदाणे येथे लहानमोठे आठ दहा गणेश मंडळे आहेत. सकाळीच गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होते. लहान मुलांनी देखील गणपती बसवला होता. चेतन व त्यांचे मित्र नंदाणे पासून सुमारे सातशे मीटर अंतरावर उत्तरेकडे सोनगीररस्त्याजवळील गावनदी व गुळनदीच्या संगमावरील महादेव मंदिर आहे. शेजारीच गावनदीला बांध बांधला आहे. तेथे सात आठ फूट पाणी आहे. बांधावर उभे राहून गणेश विसर्जन करतांना चेतन पाण्यात पडला. गाळात पाय रुतल्याने त्याला पाण्याबाहेर पडणे अशक्य झाले. सोबतच्या त्याच्याच वयाच्या मुलाने त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. पण उलट तोच पाण्यात खेचला जात असल्याने त्याने प्रयत्न सोडला. सर्व लहान मुले असल्याने व एकांतात हा भाग असल्याने कोणाचीही मदत मिळू शकली नाही. 

मुले धावतच गावात गेली व चेतन बुडाल्याचे सांगितले. तेव्हा अनेक जण धावत काही मिळेल त्या वाहनाने घटनास्थळी पोहोचले. मुलांनी चेतन बुडाला ती जागा दाखवली. रविंद्र शिवराम पाटील यांनी पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्याला सोनगीर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरणकुमार निकवाडे यांनी मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर दुपारी चारच्या सुमारास त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सर्व गणेश विसर्जन मिरवणूका रद्द करण्यात आल्या व शांततेत विसर्जन झाले. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. चेतनचे शेतकरी वडील नितीन मगन पाटील व आई वैशाली व सहावीत शिकणारा भाऊ यांचा आकांत पाहून उपस्थितांच्या डोळेही पाणावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com