esakal | दुचाकीसह दोन तरुणी थेट नदीपात्रात 
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

दुचाकीसह दोन तरुणी थेट नदीपात्रात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे ः शहरातील कठडे नसलेल्या व ठिकठिकाणी कॉंक्रिटीकरण वाहून गेलेल्या लहान पुलावरून आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन तरुणी दुचाकीसह नदीत पडल्या. सुदैवाने नदीला थोडेच पाणी असल्याने या युवती बचावल्या. या घटनेच्या निमित्ताने कठडे नसलेला लहान पूल किती धोकादायक बनला आहे, याचा प्रत्यय पुन्हा आला. या पुलावरून अधिकृतरीत्या वाहतूक बंद असली तरी त्यासाठी पाहिजे तसे नियंत्रण व व्यवस्था नसल्याने प्रशासन व पोलिस यंत्रणेचाही भोंगळ कारभार समोर आला आहे. दुसरीकडे अशा दुर्घटनांना नागरिकही तेवढेच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. 
देवपूरमधील प्रमोदनगरमधील दोन तरुणी आज सायंकाळी सातच्या सुमारास वीर सावरकर पुतळ्याकडून स्कूटीने शहरात येत होत्या. पुलावर मोठे खड्डे पडल्याने तसेच कठडे नसल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघी दुचाकीसह पांझरा नदीत कोसळल्या. नदीला कालपासून कमरेइतके पाणी असल्याने दोघी पाण्यात पडल्याने थोडक्‍यात निभावले. तरुणी पडल्याचे दिसताच तेथील दोन ते तीन तरुणांनी धाव घेत नदीत उतरले. दोन्ही तरुणींना पकडून बाहेर काढले. नदीपात्रात दुचाकी बराच वेळ पडून होती, उशिराने ती काढण्यात आली. पुलावर मोठे खड्डे असल्याने मिळेल त्या बाजूने रॉंग साइडने वाहने येतात, त्यामुळेच तरुणींचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याची चर्चा होती. 

महिनाभरानंतरही स्थिती जैसे थे 
शहरात चार व नऊ ऑगस्टला पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील नदीवरील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यासमोरील लहान पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. सद्यःस्थितीत या पुलाला कठडे नाहीत. शिवाय पुलाच्या स्लॅबचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे हा पूल अधिकृतरीत्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाकडून अनेकदा या पुलाची पाहणीही करण्यात आली. मात्र, त्याची दुरुस्ती झालेली नाही. 

अनधिकृतपणे वापर सुरूच 
प्रशासनाकडून पुलावरील वाहतूक बंद केलेली असली तरी काही दिवसांपासून या पुलाचा अनेक वाहनधारकांकडून सर्रासपणे वापर सुरू आहे. सुरवातीला पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्‌स लावलेले होते, तेही आता दिसत नाहीत. त्यामुळे वाहनधारक विशेषतः दुचाकीधारक या पुलावरूनच बिनबोभाटपणे वाहने नेताना दिसतात. त्यांना मज्जावासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने पुलाचा वापर वाढतानाच दिसत आहे. 

दुरुस्ती कधी होणार? 
पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने दिलेल्या पत्रानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची पाहणी केली. त्यानंतर महापालिकेकडून यावर काय कार्यवाही सुरू आहे, ते कळायला मार्ग नाही. पूल बंद होऊन आता जवळपास महिना होत आला आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती नेमकी कधी होणार, हा प्रश्‍नच आहे. दरम्यान, पुलाच्या दुरुस्तीपर्यंत यंत्रणेने या पुलावरून वाहतूक होणारच नाही यासाठी कठोर बंदोबस्त करण्याची गरज आहे, अन्यथा अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती नाकारता येत नाही. 

loading image
go to top