धुळ्यात ऑक्सिजनचा पुरवठा अखेर सुरळीत !

धुळ्यात ऑक्सिजनचा पुरवठा अखेर सुरळीत !

धुळे : संसर्गजन्य कोरोनाप्रश्‍नी राज्य सरकारने अचानकपणे ऑक्सिजनचा पुरवठादार बदलल्याने जिल्हा काही काळ ‘ऑक्सिजन’वर होता. त्यामुळे कोविड सेंटर स्तरावर सकाळनंतर चिंता आणि काहीसा गोंधळ निर्माण झाल्यानंतर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी पुढाकार घेत २४ तास पुरेल इतक्या संरक्षित साठ्याचा (बफर स्टॉक) पुरवठा करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. त्यामुळे रुग्णांसह कोविड सेंटर्सला दिलासा मिळाला. रात्री उशिरापर्यंत पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी यादव दालनात ठाण मांडून होते. 


शहरासह जिल्ह्यात घोषित अनेक कोविड केअर सेंटरमध्ये दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असल्याची ओरड सुरू झाली. त्यामुळे संबंधित काही रुग्णालय व्यवस्थापनांनी व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची सेवा घेत असलेल्या रुग्णांना इतरत्र उपचाराची व्यवस्था करावी, अशी सूचना दिली. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ही माहिती मिळताच जिल्हाधिकारी यादव यांनी जिल्हास्तरावर उपलब्ध ऑक्सिजनचा संरक्षित साठा उपयोगात आणण्याची सूचना यंत्रणेला दिली. या पार्श्वभूमीवर श्रद्धा हॉस्पिटलला ६५ सिलिंडर व अन्य रुग्णालयांनाही आवश्‍यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा झाला. त्यामुळे जिल्ह्यासह उपचार घेत असलेल्या रुग्णांवरचे मोठे संकट टळले, अनर्थ टळला. 


शनिवारी (ता. १०) दुपारपर्यंत ऑक्सिजनचा संरक्षित साठा पुरणार असल्याने त्यानंतरच्या साठा उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी यादव यांच्यासह अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एम. व्ही. देशपांडे रात्री उशिरापर्यंत प्रयत्नरत राहिल्याने त्यांना यशही आले. 


कोरोना संकटकाळात आतापर्यंत आयनॉक्स एअर प्रॉडक्ट कंपनी जिल्ह्याला ऑक्सिजनचा टँकरसह पुरवठा करत होती. मात्र, या कंपनीला अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्र्यांनी यवतमाळ परिसराकडे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितले. तसेच लिंडे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला धुळे जिल्हा जोडून दिला. पूर्वीची कंपनी टँकरसह ऑक्सिजनचा पुरवठा करत होती. लिंडे कंपनी केवळ ऑक्सिजन देते, टँकरची व्यवस्था ग्राहकाला करावी लागते, असे सूत्रांनी सांगितले. हा फेरबदल जिल्हाधिकारी कार्यालयास कळविल्यानंतर आणि तोपर्यंत येथील रुग्णालयांकडे तुटपुंजा ऑक्सिजन शिल्लक असल्याची ओरड सुरू झाल्यावर अधिकाऱ्यांची धांदल उडाली. त्यामुळे काही काळ ही सेवा विस्कळित झाली. शुक्रवारी दुपारनंतर बफर स्टॉक वापरात आल्यावर रुग्णसेवा सुरळीत झाली. 
 


रोज २१ टन ऑक्सिजन साठ्याची गरज 
जिल्हाधिकारी संजय यादव म्हणाले, की धुळे जिल्ह्याला रोज २३ टन ऑक्सिजन ठाण्याची गरज भासते. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. एकट्या हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयास रोज सरासरी तेरा ते साडेतेरा टन, उर्वरित शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांना मिळून रोज आठ टन, असा एकूण २१ टन साठा लागतो. यात जिल्ह्यातून सरासरी दोन टन साठा नंदुरबारला पुरविला जातो. सकाळनंतर शहरासह काही ठिकाणी ऑक्सिजन साठा संपत असल्याची माहिती मिळाल्यावर संरक्षित साठा वापरात आणण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णांना दिलासा देऊ शकलो. शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनचे रोज दोन टँकर मिळतील, म्हणजेच सरासरी दहा टन साठा उपलब्ध होईल यासाठी कसोशीने पाठपुरावा सुरू आहे. रुग्णांसह कोविड केअर सेंटरला अडचणी उद्‌भवणार नाहीत याची दक्षता घेत आहे. हिरे महाविद्यालयास स्वतंत्रपणे १३ टन लिक्विड ऑक्सिजनचा नियमित पुरवठा सुरू आहे. कुणीही अफवांना बळी पडू नये, गैरसमज पसरवू नये, रुग्णहितासाठी जिल्हा प्रशासनही कटिबद्ध आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com