भुईमुगाने काढले शेतकऱ्यांचे दिवाळे

दगाजी देवरे 
Tuesday, 13 October 2020

साक्री तालुका पावसाळी व उन्हाळी भुईमूग पिकाविषयी अग्रेसर मानला जातो. कोरडवाहू क्षेत्रात सर्वाधिक पेरणी भुईमूगाची होते. सध्या भुईमूग काढणी सुरू आहे.

 म्हसदी : यंदा भुईमूग पिकाने शेतकऱ्यांचे दिवाळे काढले आहे. महागडे बियाणे, खते आणि वाढती मजुरीचा खर्च करूनही ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ अशी अवस्था यंदा बळीराजाची झाली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची ‘दिवाळी’ कशी गोड होईल, हा खरा प्रश्न आहे. 

‘खेती करे धन का नाश’, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव यंदा बळीराजा घेत आहे. अतिपावसाचा किंवा नैसर्गिक बदलाचा मोठा फटका शेतीला बसला आहे. मुबलक पाऊस होऊनही भुईमूगाला चक्क शेंगाच नसल्याचे वास्तव आहे. स्वतः राखून ठेवलेले वा महागडे बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी अपेक्षेने यंदाही भुईमूगाची पेरणी केली. पाऊसही समाधानकारक झाल्याने चांगल्या उत्पन्नाची आस शेतकरी बाळगून होता. कोरडवाहू पिकात भुईमूग पैशाचे पीक मानले जाते. किंबहुना कोरडवाहू शेतकऱ्यांची त्याच्यावर आर्थिक मदार असते. पाऊस चांगला होऊन हाती काहीच न येण्याची कारणे शेतकरी सांगत आहेत. वाढही चांगली झाली, पण शेंगा लागण्याच्या कालावधीत वातावरण बदलाचा परिणाम झाल्याचे अनुभवी शेतकरी सांगत आहेत. दोन वर्षांपासून निसर्गाची मेहरनजर असल्याने शेतीला सुगीचे दिवस आल्याने बळीराजा सुखावला होता. सततच्या दुष्काळामुळे शेती व्यवसायावर संक्रांत आली होती. सतत दमदार पावसामुळे जलस्तर कमालीचा उंचावला आहे. हे शेतकऱ्यांसाठी समाधानाचे चित्र असले, तरी निसर्गाच्या बदलत्या परिस्थितीचा शेती व्यवसायाला फटका बसला आहे. 

भुईमूगांना चक्क शेगांच नाहीत 
साक्री तालुका पावसाळी व उन्हाळी भुईमूग पिकाविषयी अग्रेसर मानला जातो. कोरडवाहू क्षेत्रात सर्वाधिक पेरणी भुईमूगाची होते. सध्या भुईमूग काढणी सुरू आहे. शेंगाच नसल्याने मजुरी देऊन केवळ चारा म्हणून भुईमूग काढला जात आहे. काही शेतकरी जनावरे सोडून देण्याच्या मानसिकतेत आहेत. 

उंदराचा उपद्रव 
एकीकडे शेंगाच नसताना आहेत त्यावर उंदीर डल्ला मारत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेंगा लागण्याच्या कालावधीतच उंदरानी पसार केल्याचे बोलले जात आहे. वाढती मजुरी, मजुरांची टंचाईमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. 

मुबलक पाणी असूनही शेती तोट्यात असल्याने शेती कशी करावी, हा प्रश्न आहे. जेवढे पेरले तितकेही हाती येत नसेल, तर शेती पडिक ठेवलेली बरी. 
-रामराव ह्याळीस, शेतकरी, म्हसदी 
 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Climate change, excess rains damage groundnut crop, farmers worried