"घोडेबाजार' अन मुख्यमंत्र्यांची "गुगली'! 

 "घोडेबाजार' अन मुख्यमंत्र्यांची "गुगली'! 

राजकारणात घोडेबाजार हा प्रचलित परवलीचा शब्द आहे. सत्ताप्राप्तीसाठी राजकारण्यांकडून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार केला जातो. सारंगखेडा (ता. शहादा) येथे घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या यात्रेत "चेतक फेस्टिव्हल'मधील अश्व शर्यतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना सांगितले की, "यावर्षी घोडे खरेदीची तुमची इच्छा असली तरी ती तुम्ही करू नका. पुढच्या वर्षी आपण दोघे पुन्हा येथे येऊ व घोडे खरेदी करू'. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य सर्वसामान्य असले तरी राजकीयदृष्ट्या एका दगडात अनेक पक्षांना गारद करणारे आहे. मुख्यमंत्र्यांच्या या "गुगली'मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक म्हणून सर्वज्ञात आहेत. त्यातच त्यांना खासगीत सल्ला देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी जाहीररीत्या सांगितल्याने या वक्तव्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजप पक्षांतर्गत गटातटातील राजकारण व खदखद यावर जालीम औषध ठरेल, अशी चर्चा भाजपमध्येच सुरू आहे. त्याला कारणही तसे आहे. नंदुरबार जिल्ह्याचे राजकीय क्षेत्रातील चाणक्‍य व वजनदार नेतृत्व डॉ. विजयकुमार गावित हे भाजपला सोडचिठ्ठी देत स्वगृही अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परततील, अशा जोरदार चर्चा व बातम्या सुरू आहेत. 
डॉ. गावित यांचा राजकीय इतिहास पाहिला, तर राजकारणातील समयसूचकता जाणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. भविष्यात ज्या पक्षाची सत्ता येईल, त्या पक्षातच राहून आपले राजकारण करण्याची त्याची ख्याती आहे. त्यांच्या या धुरंधर चाणक्‍य नीतिमुळे गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आताचे साडेचार वर्षे सोडले तर उर्वरित वीस वर्ष ते पहिल्यांदा आमदार निवडून आले तेव्हापासून तर भाजपमध्ये प्रवेश केल्या अगोदर राज्य मंत्रिमंडळात मानाचे स्थान राखून होते. सलग चार टर्म त्यांनी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम पाहिले आहे. अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी तत्कालीन युती सरकारला पाठिंबा देत राज्यमंत्रिपद मिळविले. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडी सरकार आले तेव्हा ते कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत होते. सलग वीस वर्षे त्यांनी मंत्री म्हणून कामकाज पाहिले आहेत. या कार्यकाळात जिल्ह्यातील राजकारणात त्यांच्या शब्दाला मान आहे. कार्यकर्त्यांची मोठा फौजफाटा त्यांच्याजवळ आहे. अशा परिस्थितीत बदलत्या राजकारणाची परिस्थिती ओळखून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी फारकत घेऊन 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रसंगी आपली कन्या डॉ. हीना गावित हिला थेट भाजपच्या तिकिटावर लोकसभेच्या रिंगणात उतरवून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. नुसती निवडणूक लढविली नाही तर चक्क मुलीला खासदार बनवत त्यांनी इतिहासही रचला. कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात इतिहासात पहिल्यांदाच डॉ. गावितांनी "कमळ' फुलविले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार मतदार संघातून डॉ. गावितांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली व आमदारही झाले. भाजपने त्यांना पक्षात प्रवेश करण्यासाठी मंत्रिपदाचे आश्वासन दिल्याची चर्चा त्यांचे कार्यकर्ते करतात. मात्र, गेल्या साडेचार वर्षात डॉ. गावितांना फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान मिळाले नसल्याने त्याचे कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत. डॉ. गावित हे स्वतःही याबाबत नाराज असले तरी जाहीररीत्या ते याची कबुली देत नाही. आज ना उद्या आपण ज्येष्ठ आमदार असल्याने आपली मंत्रिमंडळात वर्णी लागेल, या अपेक्षेने ते भाजपतच राहिले आहेत. 
मात्र, गेल्या सहा महिन्याच्या कालावधीपासून ते लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी स्वगृही परततील, अशी चर्चा सुरू होती. खासदार हीना गावित याही 2019 ची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे लढवतील, अशा बातम्याही आल्या. वृत्तवाहिन्यांनी अशा प्रकारचे खात्रीलायक वृत्त दिले. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी 26 डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीस आपल्या संकटमोचकासह सारंखेडा यात्रेत चेतक महोत्सवाला आले. डॉ. गावित, खासदार डॉ. हीना गावित हे दोघं पिता-पुत्री यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचा दौरा हा काही मिनिटांचा असला तरी, या दौऱ्यात त्यांनी जे सूचक वक्तव्य केले आहे. ते जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरणार आहे. डॉ. गावितांची भाजप सोडण्याची मानसिकता, त्यातच मुख्यमंत्री नामदार महाजनांना जाहीरपणे घोडे खरेदी करू नका, असे केलेले सूचक वक्तव्य बरेच काही बोलून जाते. घोडेबाजारात घोड्यांची खरेदी विक्री लाखोंच्या घरात होते तर राजकारणातील घोडेबाजार बाजार हा तसा तेजीचा व्यवसाय आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात आयारामांची संख्या लक्षणीय असते. राजकारणात घोडेबाजार केल्याशिवाय सत्ता प्राप्त होत नाही असे अनेक उदाहरण आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी आपल्याच संकटमोचकाला का बरे घोडे खरेदी करू नका, असे सांगितले असेल, हा सर्वसामान्यांसाठी जरी गहन प्रश्न असला, तरी राजकीयदृष्ट्या ही गुगली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या गुगलीमुळे कोणाची विकेट पडते हा तर येणारा काळच ठरवेल. 
मुख्यमंत्र्यांचे घोडे खरेदी करू नका आपण पुढील वर्षी येऊन घोडे खरेदी करू हा सल्ला नामदार महाजनांना असला तरी याचा खरा अर्थ राजकीय क्षेत्रात असा आहे की पक्ष बदलण्याची भाषा करणाऱ्यांनी लक्षात घ्या, आपण पक्ष सोडला तरी भारतीय जनता पक्षात येण्यासाठी चेहरे उत्सुक आहेत. आम्ही आमच्या तयारीत आहोत. संभाव्य पक्ष सोडणार यांनी लक्षात घ्यावे की आम्ही पर्यायाच्या शोधात असून गाफील नाही. 

आयाराम-गयारामांसाठी संधी 
नामदार महाजन हे अष्टपैलू व धुरंधर राजकारणी असले तरी, प्रत्यक्षात घोड्याच्या खरेदी विक्रीबाबत त्यांची माहिती नाही व ते अश्व शौकीन आहेत याबाबतची माहिती कुठेच उपलब्ध नाही. असे असताना त्यांचा राजकीय वकूब लक्षात घेता व सत्तेच्या स्पर्धेतील त्यांचा लौकिक पाहून मुख्यमंत्र्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सध्या तरी घोडे खरेदी करू नका असे सांगितले असून, लोकसभेत जर दगाफटका झाला तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण घोडे खरेदी करू असे सांगितले असल्याची चर्चा सर्वसामान्य करीत आहेत. मुख्यमंत्र्यांचा ही सूचना म्हणजे पक्षांतर्गत नाराज असलेल्यांना इशारा असून विधानसभा निवडणुकीसाठी आयाराम-गयाराम साठी सुवर्ण संधी असल्याचे बोलले जात आहे. भविष्यात मुख्यमंत्र्यांची ही सूचना नामदार महाजन कशी मानतात यावर जिल्ह्याचे राजकारण अवलंबून आहे एवढे निश्‍चित. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com