esakal | धुळ्यात 27 पर्यंत पूर्णतः "लॉक डाउन' : जिल्हाधिकारी यादव
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात 27 पर्यंत पूर्णतः "लॉक डाउन' : जिल्हाधिकारी यादव

कोरोना विषाणूची लागण संक्रमित रुग्णांकडून अन्य व्यक्‍तीस त्याच्या संपर्काद्वारे होत असल्याची शक्‍यता विचारात घेता जिल्हाधिकारी संजय यादव यांनी संपूर्ण धुळे महापालिका क्षेत्रासाठी आदेश पारित केला आहे. 

धुळ्यात 27 पर्यंत पूर्णतः "लॉक डाउन' : जिल्हाधिकारी यादव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : संसर्गजन्य कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी 23 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 27 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत अर्थात चार दिवस अत्यावश्‍यक सेवावगळता धुळे महापालिका क्षेत्रातील इतर सर्व व्यवहारांवर "लॉक डाउन'च्या माध्यमातून बंदी घातली आहे. दरम्यान, यापूर्वीच शहरातील जे क्षेत्र "कंटेन्मेंट' क्षेत्र म्हणून घोषित आहे तेथे या क्षेत्रासाठी यापूर्वी घोषित अटी कायम राहणार आहेत. 


आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून राज्य शासनाने "लॉक डाउन'ची घोषणा केली आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्याला लागून असलेल्या जळगाव, अमळनेर, सुरत, मालेगाव तालुक्‍यात (जि. नाशिक) तसेच मध्य प्रदेशातील सेंधवा (जि. बडवानी) येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. धुळे शहरातही सहा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूची लागण संक्रमित रुग्णांकडून अन्य व्यक्‍तीस त्याच्या संपर्काद्वारे होत असल्याची शक्‍यता विचारात घेता जिल्हाधिकारी संजय यादव यांनी संपूर्ण धुळे महापालिका क्षेत्रासाठी आदेश पारित केला आहे. 

इतर सर्व व्यवहार बंद 
"लॉक डाउन' अर्थात पूर्णतः संचारबंदीमुळे 23 एप्रिल (गुरुवार) मध्यरात्रीपासून ते 27 एप्रिल (सोमवार) मध्यरात्रीपर्यंत अत्यावश्‍यक सेवावगळता इतर सर्व व्यवहार अटी-शर्तीस अधीन राहून बंद राहतील, असा आदेश जिल्हाधिकारी यादव यांनी काढला आहे. 

केवळ यांना मुभा 
हॉस्पिटल, औषधे विक्रीची दुकाने, सर्व प्रकारच्या वैद्यकीय व आनुषंगिक सेवा, किराणा दुकाने, दूध, भाजीपाला, फळ दुकाने, अतितातडीचे शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा व सुव्यवस्था हाताळणारी यंत्रणा, बॅंक यंत्रणा, महावितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी, जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले प्रिंट व इलेक्‍ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, टेलिफोन व इंटरनेट सेवा पुरविणारे अधिकारी-कर्मचारी आदींना संचारबंदी काळात कामकाजाची मुभा असेल. 

विक्रेत्यांसाठी वेळ निर्धारित 
दरम्यान, महापालिका क्षेत्रातील कंटेन्मेंट क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील अधिकृत किराणा दुकाने, भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने सकाळी आठ ते दुपारी दोन, दूध विक्रेत्यांसाठी पहाटे पाच ते दुपारी बारा, पेट्रोल पंपचालकांसाठी सकाळी 6 ते दुपारी 2 हा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. हा आदेश सद्यःस्थितीत व भविष्यात कोव्हीड-19 प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषित झालेल्या क्षेत्रास लागू राहणार नाही. या ठिकाणी कंटेन्मेंट अधिसूचनेनुसार घोषित प्रतिबंधानुसार अंमलबजावणी होईल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटनेविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे. 

नागरिकांनी घाबरून जाऊ नये : यादव 
जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले, की धुळे शहरात कोरोनाचे सहा रुग्ण आढळले. या विषाणूचे संक्रमण होऊन रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण "लॉक डाऊन'चा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठीच हा निर्णय घेतला. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. 

loading image