कोरोनाचे नियम मोडताय तर सावधान..तुमच्यावर आहे भरारी पथकांचा ‘वॉच' 

रमाकांत घोडराज
Friday, 13 November 2020

कोरोना विषाणू संसर्गाने बाधितांसह बळींचा आकडा कमी दिसत असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. संसर्गाचा उद्रेक कधीही होऊ शकतो. त्यामुळे शासन-प्रशासनाकडून नागरिकांना गर्दी टाळण्यासह मास्क लावणे,

धुळे : दीपावलीनिमित्त बाजारात प्रचंड गर्दी उसळल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अधिक आहे. हा धोका लक्षात घेऊन शासकीय यंत्रणेला उपाययोजनांसाठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः मास्क न वापरणाऱ्यांना आवाहनासह कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने अकरा भरारी पथके नियुक्त केली आहेत. दरम्यान, आग्रारोडवर महापालिकेच्या पथकाने आज (ता.१३) ही मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. 

कोरोना विषाणू संसर्गाने बाधितांसह बळींचा आकडा कमी दिसत असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. संसर्गाचा उद्रेक कधीही होऊ शकतो. त्यामुळे शासन-प्रशासनाकडून नागरिकांना गर्दी टाळण्यासह मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर आदी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, अनेक नागरिक, दुकानदार या आवाहनाला दुर्लक्षित करून मास्क न लावता बाजारात फिरत आहेत. ही स्थिती अत्यंत धोकादायक असल्याने जिल्हाधिकारी संजय यादव यांनी अशा लोकांवर कारवाईचेही निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिका, पोलिसांची पथके कारवाई करत आहेत. 

बाजारात उसळली गर्दी 
दीपावलीनिमित्त बाजारात चैतन्य आहे. खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोड, फूलवाला चौक, पाचकंदील, चर्नीरोडसह साक्रीरोड, नकाणे रोड, दत्त मंदिर चौक परिसर आदी विविध भागात नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. या गर्दीला नियंत्रण घालणे कठीण असल्याने मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलून कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. 

मनपाकडून अकरा पथके 
मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सींगचे पालन, सॅनिटायझरचा वापर नागरिक करत आहेत अथवा नाही याची खात्री करणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागात अकरा भरारी पथके नियुक्त केली आहेत. या भागासाठी पथके ः महात्मा गांधी पुतळा-जेबीरोड पोलीस चौकी-गल्ली क्रमांक-७ -सुभाष चौक- महात्मा गांधी पुतळा, जेबी रोड- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-जेबी रोड पोलीस चौकीपासून गल्ली क्रमांक-४,५,६, महाराणा प्रताप चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-पेठ गल्ली क्रमांक-१ व २, देवपूर आग्रारोडने-सुशी नालापुल-देवपूर दत्तमंदिर चौक परिसर, नेहरू चौक देवपूर परिसर, जयहिंद चौक, झाशी राणी पुतळा-राजवाडे बँक-पंडित नेहरू पुतळा साक्रीरोड, पंडित नेहरू पुतळा साक्रीरोड-सुरेंद्र डेअरी साक्रीरोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-दसेरा मैदान परिसर, पारोळा रोड प्रकाश थिएटर परिसर, मोहाडी परिसर. प्रभारी अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख प्रसाद जाधव यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule coprporation coronavirus not rules follow and watch squad