साहब..."इन्सानियत' जिंदा रहनी चाहिए...!

corona nigetive
corona nigetive

धुळे : ज्या गल्लीत आम्ही राहतो... त्याच गल्लीतील महिला आम्हाला मुलं, भाऊ मानतात. रक्षाबंधनाला आम्हाला राखी बांधतात. या "इन्सानियत'च्या नात्यानेच आम्ही मंगळवारी मदतीसाठी उभे राहिलो. "बिमारी तो आती- जाती रहेगी...इन्सानियत जिंदा रहनी चाहिए... हम तो तकदीरवाले है...' अशा भावना आहेत धुळे शहरातील हिंमतवान "त्या' मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांच्या जे मंगळवारी हिंदू वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कारांसाठी पुढे आले होते.
धुळे शहरातील पेठ भागातील गल्ली क्रमांक सातमधील वृद्ध महिलेचा "कोरोना'मुळे मृत्यू झाला. मरणोत्तर तपासणीनंतर तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. "कोरोना' संसर्गाच्या भीतीमुळे या महिलेच्या अंत्यसंस्काराकडे नातेवाइकांसह मित्र परिवाराने पाठ फिरविली. संबंधित महिलेचा मुलगाही अशा प्रसंगाने हतबल झाला. शेवटी वर्षानुवर्षे गल्लीत राहणारे काही मुस्लिम तरुण कार्यकर्ते पुढे सरसावले. त्यांनी मदतीचा हात पुढे केला अन्‌ सिव्हिल हॉस्पिटलमधून मृतदेह उचलण्यापासून ते अंत्यसंस्कारांपर्यंत त्यांनी एकहाती मदत केली.

त्यांनी घातले "पीपीई किट'
संबंधित मृत महिलेच्या मुलासह फजलूर रहमान अन्सारी, निहाल अन्सारी, इम्रान अहमद अन्सारी यांनी "पीपीई किट' परिधान करून महिलेचा मतदेह उचलला. चक्करबर्डी परिसरात महापालिकेने भाजपच्या नगरसेविका सारिका प्रवीण अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, रानमळ्याचे सरपंच प्रवीण पवार यांच्या स्वमालकीच्या खासगी निश्‍चित केलेल्या मोकळ्या जागेवर संबंधित बाधित महिलेवर रात्री अंत्यसंस्कार केले. त्यासाठी रईस हिंदुस्थानी, नसीब अन्सारी, अब्रार अन्सारी, इक्‍बाल अन्सारी, सलमान अन्सारी, ऍम्ब्युलन्स चालक अबूभाई आदी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता.

...त्यानंतरच नमाज अन्‌ सोडला रोजा
सध्या मुस्लिम बांधवांचा रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने "रोजा' सोडण्याची प्रक्रिया सुरू असतानाच भावनिक घटना कानावर आली आणि मुस्लिम कार्यकर्ते थेट मदतीसाठी सरसावले. बाधित महिलेच्या अंत्यसंस्कारांची संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर थेट घरी न जाता एका ठिकाणी त्यांनी अंघोळ केली, सॅनिटायझेशनची खबरदारी घेतली आणि नंतरच ते घरी परतले. नमाज पठणानंतर त्यांनी रात्री रोजा सोडला. "हम ने नेक काम किया...उपरवाले का शुक्रिया', अशी भावना रईस हिंदुस्थानी यांनी बोलून दाखविली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com