esakal | प्रत्‍यक्ष फिल्‍डवरचे राहिले बाजूला अन्‌ पोस्‍टर बॉईज होताय कोरोना योद्धा 
sakal

बोलून बातमी शोधा

online

कोरोनाच्या काळामध्ये कोणतेही कर्तृत्व नसताना एखादी संघटना पुरस्कार देते याचे भांडवल केले जाते. पुरस्कार मिळालेले सुज्ञ नागरिक लॉकडाउनच्या काळात घरातून बाहेर पाऊल सुद्धा न टाकणारे बरेचसे आहेत.

प्रत्‍यक्ष फिल्‍डवरचे राहिले बाजूला अन्‌ पोस्‍टर बॉईज होताय कोरोना योद्धा 

sakal_logo
By
महेंद्र खोंडे

तऱ्हाडी (जि.धुळे) : कोरोना महामारी जगामध्ये सर्वत्र लोकांची पाचावर धारण बसवली आहे. तीन महिन्यापूर्वी कोरोनाला घाबरून घरात बसणारे तरुण व प्रतिष्ठित नागरिक लॉकडाउन खुले झाल्यानंतर ‘कोरोना योद्धा’ असा ऑनलाइन पुरस्कार स्वीकारत स्वतःचेच अभिनंदन करून घेत आहेत. प्रत्यक्षात काम करणारे पोलिस, डॉक्टर, आरोग्य सेवक मात्र बाजूला राहिले आणि चमकोगिरी करणाऱ्या ‘पोस्टर बॉईज’ कोरोना योद्धा म्हणून मिरवू लागल्याने नेमका खरा कोरोना योद्धा कोण..? असा सवाल निर्माण होऊ लागला आहे. 

कोरोनाच्या काळामध्ये कोणतेही कर्तृत्व नसताना एखादी संघटना पुरस्कार देते याचे भांडवल केले जाते. पुरस्कार मिळालेले सुज्ञ नागरिक लॉकडाउनच्या काळात घरातून बाहेर पाऊल सुद्धा न टाकणारे बरेचसे आहेत. त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. याचसोबत ‘लेटर ऑफ ऑनर’च्या नावाखाली काही सामाजिक संस्था कोरोना वॉरियर्सच्या नावाने सन्मानपत्रे देत आहेत. हे पुरस्कार फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर पोस्ट करूनही त्यांना टाळ्यांचा भरभराट होत आहे. ऑनलाइन प्रमाणपत्र देणाऱ्या सामाजिक संस्था देखील उदंड झाल्याने सर्वत्र कोरोनायोध्ये दिसू लागले आहेत. 

प्रामाणिकांना नकोय प्रमाणपत्र
समाजात काही प्रामाणिक लोकदेखील आहेत. जे खरोखर कोरोनाच्‍या प्रादुर्भावात मैदानावर उतरले आहेत. अशांना प्रमाणपत्राची गरज नाही. पण काही जणांना प्रमाणपत्र पाठविल्‍यानंतर त्‍यांनी असे काहीही केले नाही; असे सांगून हा सन्मान परत केला आहे. मात्र चमकोगिरी करणाऱ्यांनी देखील काहीतरी मर्यादा पाळण्याची गरज निर्माण झाली असून खरे कोरोना योध्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्‍न करण्याची गरज आहे.

बोगस कोरोना योध्यांनी आत्मपरीक्षण करावे 
कोरोना महामारीने सर्वांना घाईला आणले असताना बोगस प्रमाणपत्र वाटणाऱ्या संस्था व बनावट प्रमाणपत्रावर वाहवाह मिळवणाऱ्या समाजसेवकानी जनाची नाही, तर किमान मनाची बाळगून असा पुरस्कार स्वीकारताना विचार करावा. डॉक्टर, पोलिस,आरोग्य सेवक हे खरे कोरोना योद्धे आहेत याचे भान ठेवून यांचे खच्चीकरण न होण्यासाठी चमकोगिरी बंद करण्याची नागरिकांतून मागणी करण्यात येत आहे.

संपादन : राजेश सोनवणे