esakal | रेमडीसेव्हीर'साठी आता धावपळ, शोधाशोध नाही 
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir injection

मध्यम व तीव्र कोविड-१९ आजारी रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हीर-१०० मिग्रॅ हे इंजेक्शन वापरले जात आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे इंजेक्शन मोफत उपलब्ध आहे. मात्र, खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणा-या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठया प्रमाणावर आहेत.

रेमडीसेव्हीर'साठी आता धावपळ, शोधाशोध नाही 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : खासगी रुग्णालयांमध्ये कोविड-१९ रुग्णांवरील उपचारासाठी रेमडीसेव्हीर इंजेक्शन (१०० मिग्रॅ) मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या राज्यभरात तक्रारी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एका खासगी औषधी केंद्रात (मेडिकल स्टोअर) हे इंजेक्शन निश्‍चित दराने व काही ठरावीक संख्येत उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. रुग्णांना ते निश्‍चित दरात उपलब्ध होईल यादृष्टीने दक्षता घेण्याबाबतच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या आहेत. 

मध्यम व तीव्र कोविड-१९ आजारी रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हीर-१०० मिग्रॅ हे इंजेक्शन वापरले जात आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे इंजेक्शन मोफत उपलब्ध आहे. मात्र, खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणा-या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठया प्रमाणावर आहेत. खाजगी रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी हे इंजेक्शन लिहून दिल्यानंतर ते प्राप्त करून घेताना रुग्णांची/नातवाईकांचो धावपळ होते. औषधांची किंमत जास्त असल्यामुळे जास्त रक्‍कम खर्च होते. या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांना वेळेत व वाजवी दराने रेमेडीसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक खाजगी औषधी केंद्रांमध्ये निश्‍चित दराने इंजेक्शन काही ठरावीक संख्येत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे पत्र प्रधान सचिव श्री. व्यास यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन पुरविण्याच्या परवानगीसाठी सक्षम अधिकारी, इंजेक्शन पुरवठा पद्धती, निश्चित केलेल्या दराने औषध उपलब्धता आदींबाबतचे दिशानिर्देश पत्रात नमूद केले आहेत. 

इंजेक्शनचा दर असा 
खासगी रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांसाठी रेमडिसिव्हीर इंजेक्शनची किंमत २२४० रुपये व १२० (पाच टक्के खासगी औषधी केंद्राचे कमिशन) असे एकूण २३६० प्रति १०० मिग्रॅ व्हायल निश्चित करण्यात आली आहे. खासगी औषधी केंद्रांकडे मागणीपत्र आल्यानंतर त्यांनी त्यात नमूद केलेल्या संख्येइतके इंजेक्शन (जास्तीत जास्त सहा व्हायल) २३६० रुपये प्रति व्हायल (करासहित) या दराने उपलब्ध करावे व त्याचे बिल संबंधित रुग्णाकडून घ्यावे. रुग्ण अथवा त्याच्या नातेवाइकांनी शासनाने निश्चित केलेल्या दराने अर्थात २३६० रुपये प्रति व्हायल खासगी औषध केंद्रास अदा करावे असेही पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. 
 
धुळे, नंदूरबारमध्ये येथे व्यवस्था 
धुळे ः छत्रपती मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स (कांकरिया टॉवर, सिव्हिल हॉस्पिटलसमोर, साक्रीरोड) व सुनील मेडिकल स्टोअर्स (२४, बडगुजर प्लॉट, ऐंशी फुटी रोड). 
नंदूरबार ः रोटरी वेलनेस सेंटर ॲण्ड मेडिसीन शॉपी (स्टेशन रोड). 

संपादन ः राजेश सोनवणे