esakal | धुळे जिल्ह्याला जानेवारीत कोरोना लस 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus vaccine

शहरासह जिल्ह्यात एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. आतापर्यंत १४ हजार २०५ रुग्ण आढळले आहेत. पैकी १३ हजार ६१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

धुळे जिल्ह्याला जानेवारीत कोरोना लस 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : जिल्ह्याला जानेवारीत कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक लसचा पुरवठा होईल. यात वेगवेगळ्या चार कंपन्यांपैकी कुठल्या कंपनीच्या लसीचा पुरवठा होईल, हे अद्याप समजलेले नाही. मात्र, पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईनवरील नऊ हजार हेल्थ केअर वर्कर्सला लस दिली जाणार आहे. तसे नियोजन जिल्हा पातळीवर होत आहे. 
शहरासह जिल्ह्यात एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. आतापर्यंत १४ हजार २०५ रुग्ण आढळले आहेत. पैकी १३ हजार ६१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच ३८५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांचे नियोजन आणि त्यास निरनिराळ्या शासकीय व खासगी आरोग्य संस्थांची साथ लाभल्याने स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, या आजाराचा धोका टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे चार कंपन्यांच्या लसीचा पुरवठा केला जाईल. यात वेगवेगळ्या कंपनीच्या लसीचा दोन किंवा तीन डोस घ्यावा लागेल. 

नऊ हजार जणांना पहिल्‍या टप्प्यात लस
पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालये, दवाखान्यांमधील डॉक्टर, त्यांचे कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर्स यासह आरोग्य कर्मचारी मिळून एकूण नऊ हजार जणांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल. या प्रक्रियेपूर्वी राज्य आणि तालुका पातळीपर्यंत प्रशिक्षण सुरू झाले आहे. राज्यस्तरीय प्रशिक्षणात मंगळवारी (ता. १५) जिल्ह्यातील सरासरी १२ अधिकारी सहभागी झाले. त्यांना लस कशी द्यायची, तिचा साठा कुठे व कशा पद्धतीने करावा यांसह विविध उपयुक्त माहिती दिली. 

एक बुथ चार अधिकारी
प्रथम चार अधिकाऱ्यांनी कुठली जबाबदारी पार पाडावी, याची सूचना दिली. एका बुथमध्ये शंभर जणांना लस देण्याचे नियोजन आहे. पहिला अधिकारी नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांची ओळख तपासेल. त्याची दुसरा अधिकारी पडताळणी करेल. तिसरा अधिकारी लसचा पुरवठा करेल आणि चौथा अधिकारी या प्रक्रियेवर देखरेख ठेवेल, अशी माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली. जानेवारीत लसचा पुरवठा झाला, की पुढील वेळेत बचत होण्यासाठी प्रशिक्षण सुरू झाल्याचे ते म्हणाले. 

२१ दिवसांचा अवधी तपासणार 
फ्रंट लाईनवरील सर्व नऊ हजार आरोग्यसेवक, वैद्यकीय व्यावसायिक, अधिकाऱ्यांना २१ दिवस अगोदर कोरोनाची लागण झाली असेल, तर त्यांना प्रतिबंधात्मक लस देता येणार नाही. मात्र, २१ दिवस किंवा त्यापेक्षा अधिकारी दिवस झाल्यास त्यांना लस घेता येऊ शकेल. या पहिल्या टप्प्यानंतर सरकार दुसऱ्या टप्प्याचे नियोजन ठरवेल. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top