esakal | ४९ कोटीपैकी आठ लाख वसूल; धुळे मनपाची जप्ती मोहिम 

बोलून बातमी शोधा

dhule corporation}

महापालिका प्रशासनाने तब्बल १०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली सहा पथके उतरवली आहेत. या पथकांनी आज मोहिमेच्या पहिल्या दिवशी एक मालमत्ता सील केली

४९ कोटीपैकी आठ लाख वसूल; धुळे मनपाची जप्ती मोहिम 
sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने वसुलीसह जप्ती मोहीम सुरू केली. या मोहिमेसाठी महापालिका प्रशासनाने तब्बल १०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली सहा पथके उतरवली आहेत. या पथकांनी आज मोहिमेच्या पहिल्या दिवशी एक मालमत्ता सील केली तर केवळ आठ लाख रुपयांपर्यंत वसुली केली. थकबाकीदारांकडे महापालिकेचे तब्बल ४९ कोटी रुपये घेणे आहे हे विशेष. 

थकीत मालमत्ता कर वसुली मोहिमेत पथकाने आज (ता.१) गल्ली नंबर- ७ मधील नाटेश्‍वर कॉलनीतील थकबाकीदार रमेश विश्‍वनाथ धात्रक यांची मालमत्ता सील केली. उपायुक्त‍ शिल्पा नाईक, वसुली अधीक्षक बळवंत रनाळकर, निरीक्षक राजकुमार सूर्यवंशी, लिपिक विकास कोळवले, सुनील वर्पे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

आठ लाख वसूल 
थकीत मालमत्ता करापोटी धनादेश व रोख असे सुमारे आठ लाख रुपये पथकांनी थकबाकीदारांकडून वसूल केले. दरम्यान, नियुक्त पथकांनी आज विविध भागातील थकबाकीदारांना नोटीस देऊन थकबाकी भरण्याचे आवाहन केले. 
 
बिले काढण्यासाठी पठाणी वसुली : मोरे 
कोरोना महामारीचे गंभीर संकट असताना खोटी बिले काढण्यासाठी राबवण्यात येणारी पठाणी वसुली थांबवा अन्यथा वसुली पथकांना नागरिक पिटाळून लावतील असा इशारा माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे मनोज मोरे यांनी आयुक्तांना खुल्या पत्रातून दिला आहे. 
कोरोनासारख्या गंभीर संकटामुळे वर्षभर लोकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. खाजगी नोकरी करणारे घरी बसून आहेत तर छोटे- मोठे व्यावसायिकही देशोधडीला लागले आहेत. कामगारांची परिस्थिती तर अत्यंत दयनीय आहे. अशा काळात धुळे शहराची पालक असलेली महापालिका धुळेकर नागरिकांना कसे सांभाळता येईल किंवा काय मदत करता येईल हा विचार सोडून उलट धुळेकरांच्या मुळावर उठणे योग्य आहे का, कराच्या मोबदल्यात महापालिका काय सुविधा देते याचे उत्तर द्यावे. वसुलीच्या रकमेतून महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने मनपाच्या तिजोरीवर संयुक्त दरोडा टाकण्याचा एकमेव कार्यक्रम चालवला आहे त्यासाठीच हा प्रपंच असल्याचा आरोपही श्री. मोरे यांनी केला. मनपा प्रशासनाने ही वसुली मोहीम स्थगित करावी, शास्तीमाफी योजना राबवावी कोणत्याही नागरिकावर जप्तीची कारवाई होऊ देणार नाही असे श्री. मोरे यांनी म्हटले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे