आयुक्तसाहेब... एकदा पाहणी कराच ! 

dhule coproration
dhule coproration

धुळे : शहरातील देवपूर भागात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम अत्यंत विचित्र पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी आयुक्तसाहेब एकदा पाहणी कराच, असे आवाहन स्थायी समिती सभेत एका सदस्याने केल्याचे आज पाहायला मिळाले. 


स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत सदस्य कमलेश देवरे यांनी भुयारी गटार योजनेच्या कामाचा विषय मांडला. देवपूर भागात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. मात्र नियोजन नसल्याने या कामामुळे नागरिक त्रस्त आहेत. अत्यंत विचित्र पद्धतीने काम सुरू आहे. काम सुरू करताना कुणालाही पूर्वसूचना दिली जात नाही. एकाच गल्लीत चार-पाच जेसीबी लावून रस्ते ब्लॉक केले जातात, नळ कनेक्‍शन तोडले जातात. कुणाच्या घरी लग्नकार्य असेल तर त्याला त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्ते खोदल्याने संपूर्ण देवपूरमध्ये धुळच धूळ आहे व त्यामुळे 60-70 टक्के खोकल्याचे रुग्ण झाल्याचेही श्री. देवरे म्हणाले. दरम्यान, भुयारी गटार व पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकांना देवपूर भागातील नगरसेवकांना बोलवा अशी सूचना सभापती सुनील बैसाणे यांनी केली. 

बगीचा कामांची चौकशी करा 
सदस्य भारती माळी यांनी प्रभाग क्रमांक- 2 मध्ये दोंदे कॉलनी व श्रीरंग कॉलनीतील अमृत योजनेंतर्गत बगीचा कामांचा प्रश्‍न उपस्थित केला. "सकाळ'चा संदर्भ देत त्यांनी या कामात गैरप्रकार होत असेल तर जाब विचारणे आमचे काम आहे. ठेकेदाराचे बिल अदा केले का अशी विचारणा दोन महिन्यापूर्वी केली होती, त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या कामांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली. याविषयावर विभागप्रमुख या नात्याने आपण माहिती घ्या आणि मला सादर करा अशी सूचना आयुक्‍त शेख यांनी अभियंता कैलास शिंदे यांना केली. 
 
जीव जाण्याची वाट पाहता का? 
साक्रीरोड भागात एका व्हॉल्व्हच्या खड्ड्यात सात-आठ वर्षाची मुलगी पडल्याने जखमी झाली. हे खड्डे बुजविणार की जीव जायची वाट पाहणार असा प्रश्‍न अमोल मासुळे यांनी केला. त्यावर सभापती बैसाणे यांनी संबंधिताला दंड करण्याचा आदेश दिला. श्री. मासुळे यांनी कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीला पाठीशी घातले जात असल्याचा, जेसीबी खरेदी न करण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com