सत्ताधारी, प्रशासनाचा मनपा तिजोरीवर दरोडा 

dhule corporation
dhule corporation

धुळे : शहरातील छत्रपती मेडिकलसमोरील रस्त्याच्या चौकशीत महापालिका आयुक्त चालढकल करीत आहेत, असे म्हणत या रस्त्यासाठी निविदाप्रक्रिया राबविणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे मनोज मोरे यांनी गुरुवारी (ता. ११) पत्रकार परिषदेतून केली. महापालिकेतील सत्ताधारी भाजप व प्रशासन महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. 
धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयासमोरील छत्रपती मेडिकल ते कालिकामाता मंदिरादरम्यानच्या रस्ते कामात भ्रष्टाचार झाल्याचा श्री. मोरे यांचा आरोप आहे. या प्रकरणी श्री. मोरे यांनी त्याच रस्त्यावर गुरुवारी (ता. ११) तात्पुरता मंडप टाकून पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, डॉ. सुशील महाजन, गुलाब माळी, बबन थोरात, राजेश पटवारी, संजय वाल्हे, संदीप चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख ॲड. पंकज गोरे आदी उपस्थित होते. 

पालकमंत्र्यांकडे तक्रार
मोरे म्हणाले, की धुळे शहरातील बहुसंख्य रस्त्यांची स्थिती वाईट आहे. मात्र, फारसा खराब नसलेल्या छत्रपती मेडिकलसमोरील रस्त्याचे काम घेण्यात आले. ५६ लाख रुपये खर्चाचा नवीन रस्ता तयार करण्याची आवश्यकता होती का, असा सवाल करत एवढे करून भ्रष्टाचाऱ्यांचे पोट न भरल्याने पुन्हा त्याच रस्त्यासाठी नवीन निविदा काढून कार्यादेश दिला. याबाबत महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्याकडे व नंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे तक्रार केली. श्री. सत्तार यांनी महापालिका आयुक्तांना चौकशीचा आदेश दिला. मात्र, अद्यापही चौकशी झालेली नाही. आयुक्त श्री. शेख उडवाउडवी करीत आहेत. त्या मुळे या प्रकरणात त्यांनीही हात ओले करून घेतल्याची आमची खात्री झाल्याचा आरोप श्री. मोरे यांनी केला. रस्ते प्रकरणी शिवसेना स्टाइलने आंदोलन, त्यानंतर उपोषण, अधिकारी- पदाधिकारी व ठेकेदारांच्या संपत्तीच्या चौकशीचीही मागणी करू, असे श्री. मोरे म्हणाले. 

फौजदारी कारवाई हवी 
रस्ते प्रकरणी आयुक्तांनी निविदा, बिल थांबविल्याचे सांगितले आहे. मात्र, तेवढ्यावर आमचे समाधान नाही. निविदाप्रक्रिया राबविणाऱ्यांना, अधिकाऱ्यांना निलंबित करावे, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी श्री. मोरे यांनी केली. 
 
टक्केवारीमुळे ठेकेदार पळाले 
माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आयुक्तांना महापालिकेत बसविले आहे. त्यांच्या इशाऱ्यावरून कामे सुरू आहेत. ५०० कोटींची कामे करण्याचा आव भाजपने आणला होता. मात्र, प्रत्येक कामात भरमसाट टक्केवारी घेतल्यामुळे ठेकेदार पळून गेले, काम निकृष्ट झाल्याने निधी थांबविला गेला आहे व सद्यःस्थितीला सर्व कामे बंद आहेत, असा दावाही श्री. मोरे यांनी केला. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com